प्रवाशांचा गुडघाभर पाण्यातून प्रवास

ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकालगत वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना पूर्व आणि पश्चिम असा प्रवास करण्यासाठी बनवलेल्या भुयारी मार्गाचे तळे हे रूप बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात मार्गात पाणी साचल्याने वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. भुयारी मार्गातून प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

भुयारी मार्गात बसविण्यात आलेले दिवे रात्री बंद असल्याने अंधारातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. स्थानकाबाहेर जाण्यासाठी अथवा आत येण्यासाठी भुयारी मार्गाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

या ट्रान्सहार्बर मार्गावरील सहा रेल्वे स्थानकांलगतच्या भुयारी मार्गात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. भुयारी मार्ग तयार करून दहा वर्षे झाले तरी अद्याप त्यावर कोणताही ठोस उपाय शोधण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. कोपरखरणेत वाहने आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या दोन भुयारी मार्गात भिंत नाही. यामुळे एका ठिकाणी साचलेले पाणी दुसऱ्या मार्गात जाऊन दोन्ही भुयारी मार्ग पाण्याखाली जातात. या वेळी पाण्याने ठरावीक उंची गाठल्यानंतर वाहनांची रहदारी पूर्णपणे ठप्प होते.

त्यामुळे रहिवासी भागातून ठाणे-बेलापूर मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना घणसोली, कोपरखरणेदरम्यानच्या महापे पुलाचा पर्यायी वापर करावा लागत आहे. काही पादचारी पाण्यातून मार्ग काढतात, तर काही जण रूळ ओलांडण्याचा धोका पत्करून लोकल पकडतात. भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावला जातो; मात्र पाण्याच्या साठय़ाच्या तुलनेत पंपाची क्षमता कमी असल्याने तो बंद पडतो.

कोपरखरणे, घणसोली, रबाळे, ऐरोली आणि सानपाडा या रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गातही तीन फुटांपर्यंत पाणी साचते. यंदाही त्यातून प्रवाशांची सुटका झालेली नाही. तुभ्रे व रबाळे येथील भुयारी मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. याबाबत सिडकोचे अधीक्षक अभियंता के. एन. गोडबोले यांनी साचलेले पाणी उपसण्यासाठी पंप बसविण्यात आल्याचे सांगितले.