महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग; नागरी समस्यांवर भर
उरणमधील डॉक्टर्स, इंजिनीअर, पत्रकार तसेच विविध सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या पन्नास ते साठ सदस्यांच्या उरण अलाइव्ह हॉटस अॅप ग्रुपने रविवारी उरण शहरातून पाणी वाचविण्याचा संदेश देणारी पाणी बचाव रॅली काढली होती. या रॅलीत उरणमधील महिला संघटना, सामाजिक कार्यकर्त्यां यांनी सहभाग घेऊन उरणच्या जनतेला पाणी वाचविण्याचे आवाहन केले. या वेळी उरणचे आमदार, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, व्यापारी संघटना यांनीही रॅलीत सहभागी घेतला होता. हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उरणमधील नागरिकांनी कौतुक केले.
उरण तालुक्यात अडीच लाख लोकसंख्येला तसेच येथील औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणारी दोन धरणे आहेत. या दोन्ही धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे, तर उरणला हेटवणे या नवी मुंबईच्या होणाऱ्या धरणातील पाणीही कमी करण्यात आलेले आहे. त्यामुळे उरण सध्या पाणीटंचाई भासत नसली तरी एमआयडीसीने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आठवडय़ातील मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी तालुक्यात पाणीकपात करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मराठवाडय़ासह रायगड व ठाणे जिल्ह्य़ातील काही भागांतही पाणीटंचाई भासू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तर अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन उरणमधील नागरिकांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य तो वापर व उपयोग करावा, असे आवाहन या रॅलीतून करण्यात आले.
पेन्शनर्स पार्क येथून निघालेल्या या रॅलीला उरणचे आमदार मनोहर भोईर, उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण, उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. तसेच उरणमधील तेरा पंथ महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांही सहभागी झाल्या होत्या. ही रॅली पेन्शनर्स पार्क, स्वामी विवेकानंदन चौक, गांधी पुतळा, वाणी आळी, मोहल्ला मार्गे बाजारातून जरीमरी मंदिर, खिडकोळी नाका, पालवी रुग्णालय मार्ग ते कामठा व विमला तलावावरून गणपती चौकात नेण्यात आली. रॅलीमध्ये पाणी वाचविण्याचे आवाहन करणाऱ्या विविध घोषणांचे फलक घेऊन ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी पाणी हे जीवन, पाणी वाचवा पाणी वाढवा, पाण्याचा अपव्यय टाळा आदी घोषणाही देण्यात आल्या. या रॅलीला उरणच्या जनतेने उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला. या पुढील काळात उरणमधील भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे, पाण्याची जुनी ठिकाणे शोधून त्याची दुरुस्ती करणे, समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून बंधारे घालणे आदी उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2016 रोजी प्रकाशित
उरणमध्ये पाणी बचत रॅली
उरण तालुक्यात अडीच लाख लोकसंख्येला तसेच येथील औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणारी दोन धरणे आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-03-2016 at 01:09 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water savings rally in uran