पनवेल तालुक्यात पाण्यासाठी दाहीदिशा, टँकर दोन हजारांवर
पनवेल तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी रहिवाशांना पाण्याचा टँकर दोन हजार रुपयांना विकण्याचा सपाटा सुरू आहे. औद्योगिक वसाहतीत हाच दर अडीच हजारांवर गेला आहे. हिवाळ्यात हाच दर ३५० रुपयांना विकला जातो. या दरात सात ते आठ पटीने वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात विंधणविहिरी आणि विहिरीचे पाणी मिळत आहे. करंजाडे या एकमेव वसाहतीला आजही सिडकोच्या जलवाहिनीतून पुरवठा केला जात नाही. सुमारे दोन दशलक्ष लीटर पाणी या वसाहतीला लागते. या वसाहतीत सध्या सिडको ४५ टँकर पुरवते.
खारघरमधील सेक्टर-३६ मधील सिडकोच्या महत्त्वाकांक्षी ‘व्हॅलीशिल्प’ या गृहप्रकल्पाची अवस्था आहे. येथील रहिवाशांना सिडको टँकरनेच पाणी पुरवठा करीत आहे.
पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या १५ दिवसांत करंजाडेकरांना जलवाहिनीतून सिडको पाणीपुरवठा करेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सिडको हे पाणी घेणार आहे. सिडको वसाहतींमध्ये ज्या कामोठे वसाहतीपासून तालुक्याचे पाण्याचे राजकारण सुरू झाले त्या कामोठे वसाहतीमधील रहिवाशांना १२०० ते १५०० रुपये दिल्यानंतर टँकरभर पाणी मिळते. या वसाहतीमध्ये दिवसाआड पाणी पुरवठय़ाची योजना सिडकोने जाहीर केली आहे. तळोजा पाचनंदनगर येथील रहिवाशांना काही तासांतच पाणीपुरवठा होत असल्याने त्यांनाही दोन हजारांपर्यंत एक टँकर मिळतो.
पनवेल नगर परिषदेतील नागरिकांकडे हक्काचे धरण आहे; पण त्यामध्ये पाणी नाही, अशी अवस्था आहे. देहरंग धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. तसेच उंची न वाढविल्याने पनवेलमधील रहिवाशांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या वसाहतीत टँकरलॉबीचा सुळसुळाट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

दुर्लक्षामुळे पाणीमाफियांची चंगळ
जगदीश तांडेल, उरण
उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी तसेच हेटवणे धरणाच्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी छिद्रे पाडून पाणी चोरी बिनधोक सुरू आहे. काही ठिकाणी देखभाल-दुरुस्तीअभावी गळती लागली आहे. त्यामुळे याचा लाभ घेत आहेत. येथील पाणीमाफिया पंप लावून टँकर भरत आहेत. त्यामुळे टँकर लॉबीचा व्यवसाय जोरात सुरू आहे.
नागरिकांच्या पाणीपुरवठय़ात मात्र कपात केली असताना चोरी केलेल्या पाण्याचा वापर बांधकामासाठी सुरू आहे. दुष्काळात पाण्याचा थेंबन्थेंब वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पाणी विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष अक्षम्य आहे. उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना दास्तान ते जासई दरम्यान अनेक ठिकाणी छिद्रे पाडण्यात आली आहेत. जलवाहिनीभोवती गवत वाढल्याने पाण्याचे नुकसान लपून राहते. मुख्य रस्ते तसेच गवताळ भागातील जलवाहिन्या फोडून त्या ठिकाणी खड्डा खणला जात आहे. तेथून पाणी टँकरमध्ये भरले जात असल्याचे चित्र दाखविले जाते. अशाच पद्धतीने पेणमधून येणाऱ्या नवी मुंबईच्या हेटवणे धरणाच्या जलवाहिन्यांमधून पाण्याची चोरी केली जात आहे. पाणी चोरांवर सिडकोने याआधी कारवाईही केली होती. दुष्काळातही उरणमधील बहुतांशी जलसाठे कायम असले तरी मान्सूनच्या पावसाचा भरवसा नसल्याने पाणीटंचाईच्या काळात शासनाकडून दक्ष राहून पाणी चोरी करणाऱ्या विरोधात मोहीम राबविण्याची गरज आहे. तरीही येथील स्थानिक शासन आणि प्रशासन जनतेच्या तक्रारीची वाट पाहात आहे.त्याचप्रमाणे अनेक ठिकाणच्या सार्वजनिक विहिरींतूनही पाणी चोरी केली जात आहे. या संदर्भात उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता जलवाहिनी फोडून पाणी चोरी केली जात असल्यास ज्या पाणीपुरवठा विभागाची ही वाहिनी असेल त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून कारवाई करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पाण्याचे दर
पिण्याच्या पाण्यासाठी १५०० रुपयांपासून २००० रुपये १० हजार लिटर, बांधकामासाठी १२०० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंतचा दर आहे. तर शासकीय योजनेतून पाणीपुरवठा करावयाचा असल्यास डोंगर आणि सपाट भागासाठी दर एक हजार लिटर मागे, तसेच दर किलो मीटर अंतरामागे पैसे दिले जातात.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in navi mumbai
First published on: 28-04-2016 at 02:06 IST