देहरंग धरणाच्या पातळीत घट ; उंची वाढवण्याचा प्रस्ताव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेलकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. धरण कोरडे पडू लागले आहे. सत्ताधारी व प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांत पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने ही वेळ आली आहे. नवी मुंबई पालिकेकडून दररोज ३०-४० टँकर पाणी उधार घेतले जात आहे. ते खारघरहून आणण्यासाठी पुरेसे टँकरही पालिकेकडे नाहीत. भविष्यात देहरंगची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्य शासनाच्या वतीने ‘व्यापकॉस संस्था’ त्याचे सर्वेक्षण करीत आहे.

शहरी आणि ग्रामीण भाग मिळून तयार झालेल्या पनवेल पालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. एप्रिलमध्येच पाण्यावरून रणकंदन माजू लागले आहे. नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणाची जलवाहिनी याच पनवेल शहराला खेटून जाते. तरीही मुबलक पाणी असलेल्या या धरणातील पाणीदेखील पनवेलकरांना मिळणे कठीण आहे. सिडकोच्या शहरी भागापैकी जो भाग पनवेल पालिकेत येतो, त्यांनाही जलसंपदा विभागाच्या पेणमधील हेटवणे धरणाचा पाणीपुरवठा केला जात आहे. तळोजा एमआयडीसी तसेच शहरी भागाला सुरळीत पाणीपुरवठा होत आहे, मात्र जुना पनवेलकर पाण्याविना सध्या व्याकूळ असून एक दिवसाआड तो देखील अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे.

सोमवारी अनेक प्रभागांतील महिलांनी प्रशासनाला घेराव घातला. मात्र हा प्रश्न सुटण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. सत्ताधारी भाजपने आम्ही पाणीपुरवठा करू असे जाहीरपणे सांगितले आहे, पण त्यांच्याकडून अद्याप पुरेशी व्यवस्था झालेली नाही. नवी मुंबई पालिकेकडून ५० टँकर पाणी मंजूर करण्यात आले आहे पण ते आणण्यासाठी खारघपर्यंत धाव घ्यावी लागत आहे. त्यासाठी लागणारे टँकर कमी पडू लागले आहेत. नवी मुंबई पालिकेने पनवेल शहरात त्याची जोडणी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

माजी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी नवी मुंबई पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन पाण्यासाठी गळ घातली होती. त्यानंतर शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांनीही  नाईक यांची भेट घेतली. आता नवी मुंबई पालिकेकडून ५० टँकर पाणी मंजूर झाले आहे पण तेही पुरेसे नाही. त्यामुळे पाण्यावर ठोस उपाय निघालेला नाही.

हेटवणे धरणाचे पाणी पनवेलकरांना देण्यास सिडको तयार नाही. आजूबाजूला अनेक छोटी-मोठी धरणे असताना पनवेल प्रशासनाने पाण्याची तरतूद केलेली नाही.

देहरंगमधून १६ दशलक्ष लिटर पाण्याची पालिकेला अपेक्षा होती, ती आता शून्य झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण १० दशलक्ष लिटर पाणी देते ते आठ दशलक्ष लिटरवर आले आहे. एमआयडीसीनेही तीन दशलक्ष लिटर पाणीपुरवठा कमी  केला आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी पनवेलकरांची कोंडी झाली आहे. ४० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी पनवेलला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणाची उंची दुप्पट वाढविण्याचा एक प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. त्यासाठी ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. ही उंची वाढविण्यासंर्दभात राज्य शासनाची ‘व्यापकॉस’ ही संस्था सर्वेक्षण करणार आहे. देहरंगची उंची वाढविल्यानंतर या शहराला दिवसाला लागणारा किमान पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. अमृत योजनेअंर्तगत पाताळगंगा नदीतून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे, पण त्याबाबत अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे पनवेलकरांच्या घशाला पडलेली कोरड आणखी काही काळ कायम राहणार आहे.

वाळूमाफियांकडून उपसा सुरू

* पनवेल शहरापासून सतरा किलोमीटर लांब असलेल्या देहरंग धरणातील पाण्याने तळ गाठल्यानंतर तेथे लगेच वाळू माफियांनी उत्खनन सुरू केले आहे. पालिकेने दोन दिवसांपूर्वी उत्खन्नन करणाऱ्या जेसीबी, डंपरवर कारवाई केली. वाळूउपसा करण्याएवढी धरणाची पाणी पातळी खालावली आहे.

*  या धरणातून आजूबाजूचे आदिवासी पाणी भरतात. त्यांनाही आता पाण्याच्या दुर्भीक्ष्याला समोरे जावे लागणार आहे. त्यामुळे खड्डे खोदून पाण्याचा साठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न हे अदिवासी करत असल्याचे दिसते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water stock in dehrang dam at panvel decreased day by day
First published on: 18-04-2018 at 01:37 IST