राज्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाईच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तो पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने उपलब्ध असलेल्या पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही पत्राद्वारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जलतरण तलाव पावसाळा सुरू होईपर्यत बंद ठेवण्याचे सांगितले आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रातील जलतरण तलावांना पुरविण्यात येत असलेला पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. पालिका क्षेत्रातील बेलापूर विभागातील ८, नेरुळ १९, वाशी १०, तुभ्रे १२, कोपरखरणे ६ व ऐरोली ७ या विभागातील अशा एकूण ६२ जलतरण तलाव असलेल्या शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले, जिमखाना तसेच खाजगी गृहनिर्माण संस्था यांना पालिकेने पत्र देऊन पाणीपुरवठा बंद करण्याचे कळविले आहे. त्यानुसार सर्वच संस्थांनी याला सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे. तरी सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा कमीत कमी, आवश्यक तेवढाच वापर करावा व कोणत्याही स्वरूपात पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.