हिरवळ टिकविण्यासाठी स्प्रिंक्लरने पाणी; वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी
राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याचा दुष्काळ सुरू असताना उरणच्या जेएनपीटी कामगारांच्या कामगार वसाहतीत पाण्याची अक्षरश: नासाडी होत आहे. येथील हिरवळ जगविण्यासाठी जेएनपीटी बागकाम विभागाकडून स्प्रिंक्लरने (पाणी तुषारणी यंत्र) पाणी दिले जात असून अर्धा तास देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात उरण तहसीलदार तसेच जेएनपीटी प्रशासनाकडे त्यांनी तक्रार केली आहे.
मंगळवारी जागतिक पाणी दिन साजरा होत असताना पाणी बचावाचे संदेश सर्वत्र दिले जात असताना जेएनपीटी वसाहतीतील ही परिस्थिती मात्र कायम आहे. जेएनपीटीच्या कामगार वसाहतीत येथील हिरवळ जगविण्यासाठी पाणी तुषारणी यंत्रे लावण्यात आली आहेत. या यंत्रांमुळे हिरवळीवर पाणी कमी तर वाया अधिक जात आहे. हे पाणी रस्ते व गटारातूनही जात असून अनेक चारचाकी वाहन चालक या संधीचा फायदा घेत आपले वाहन धुऊन घेत आहेत. आठवडय़ातून दोन दोन दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागणाऱ्या या कामगार वसाहतीत ही स्थिती असल्याने येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.
या संदर्भात जेएनपीटीच्या सार्वजनिक विभागाचे मुख्याधिकारी ए.जे. लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देतो, असे त्यांनी सांगितले. राज्यात गंभीर पाणी स्थिती निर्माण झाल्याने पाण्याचा गैरवापर किंवा पाण्याची नासाडी केली जात असल्यास या संदर्भात प्रशासकीय पातळीवर काय करता येते का, अशा प्रश्न उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांना केला असता या संदर्भात तहसील तसेच जेएनपीटी प्रशासनाला पत्र देण्याची सूचना त्यांनी केली. हिरवळ किंवा झाडे जगविण्यासाठी पाण्याचा वारेमाप वापर न करता आवश्यक तेवढय़ाच पाण्याचा वापर कसा करता येईल याचा विचार व्हावा, त्यानुसारच पाणी देण्यात यावे अशी मागणी उरण अलाईव्ह ग्रुपचे निमंत्रक आशीष घरत यांनी केली आहे. यासाठी संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.