उरणमधील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी ‘उरण अलाईव्ह’ने पाणी वाचवा, पाणी साठवा या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील विहिरींचे सर्वेक्षण सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत या विहिरींच्या सफाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. याची सुरुवात उरण शहरापासून करण्यात आली आहे.
पाण्यावरून राज्यात काही ठिकाणी वादंग सुरू आहेत. जीव धोक्यात घालून करावी लागणारी वणवण अशी स्थिती उरण तालुक्यात नाही. उलट अनेक ठिकाणी लागलेल्या पाणीगळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची स्थिती आहे. तालुक्यात दोन दिवसांची पाणीकपात असली तरी पाणीटंचाई मात्र नाही. त्यामुळे अशा प्रकारची स्थिती येणारच नाही असा भ्रम बाळगणे महाग पडू शकते. उरणमध्ये पावसाळ्यात २६०० ते ३ हजार मिलिमीटर इतका पाऊस होतो. त्याची क्षमता कमी होऊन तो १५०० च्या आत आला आहे. त्यामुळे ही स्थिती धोक्याचा इशारा देणारी आहे. उरण शहर व तालुक्यात पाणीपुरवठय़ासाठी विहिरी मोठय़ा प्रमाणात खोदण्यात आलेल्या आहेत. यातील बहुतांशी विहिरी या खासगी आहेत. असे असले तरी हे पाणी सर्वासाठी उपलब्ध आहे. मात्र त्याचा वापर अनेक वर्षे सार्वजनिक पाणवठय़ासाठी केला जात आहे. तालुक्यातील खारेपाट विभागातील पिण्याच्या पाण्यासाठी १९३४ साली उरणमधील विहिरीतून पाणीपुरवठा करणारी योजना राबविली गेली होती. रानसई धरणाची निर्माती झाल्यानंतर विहिरींकडे दुर्लक्ष झाल्याने विहिरींची दुरवस्था झाली आहे. अनेक विहिरींच झरे नष्ट होऊ लागले आहेत. या विहिरींची साफसफाई करून उरणमधील पाणीसाठय़ाची जपणूक करण्यासाठई या ग्रुपने उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांची भेट घेऊन ही मोहीम राबविणार असल्याचे कळविले असून मदतीचे आवाहन केले आहे. त्यासाठी विहिरींचे सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. या वेळी ग्रुपचे सदस्य डॉ. मनोज बद्रे, आशीष घरत, महेश घरत, विरेश मोडखरकर, महेश म्हात्रे, अमृता कर्णिक, निरंजन राऊत आदी जण उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2016 रोजी प्रकाशित
उरणमध्ये विहीर सफाई मोहिमेला आरंभ
उरण अलाईव्ह’ने पाणी वाचवा, पाणी साठवा या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील विहिरींचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-04-2016 at 01:14 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Well cleaning campaign started in uran