नवी मुंबई : सानपाडा पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि फिर्यादी हे मिळेल ते काम करून गुजराण करणारे आहेत. मोहमद जमशेद सकेरूल खान, असे आरोपीचे नाव आहे.
सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमृत गार्डन, सिलीकॉन टॉवरसमोर एका ३३ वर्षीय महिलेचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. सानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन नांद्रे आणि पोलीस नाईक अझहर मिर्झा, सचिन पाटील यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. मृत महिलेने सानपाडा पोलीस ठाणे येथे मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली होती. हा धागा पकडून सानपाडा पोलीसकडून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास केला व अनेक साक्षीदारांकडे चौकशी केल्यानंतर मोहमद जमशेद सकेरूल खान या व्यक्तीकडे संशयाची सुई सरकली.
हेही वाचा – नवी मुंबई : बाजारात रसाळ फळांची मागणी वाढली, ग्राहकांची कलिंगड, द्राक्षाला अधिक पसंती
हेही वाचा – नवी मुंबई : महापालिकेचे ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालय नवजात शिशूंसाठी ठरतंय वरदान
आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्याचा शोध घेतला, मात्र तो वाशी रेल्वे स्टेशनवरच राहत असल्याने रोज तिथेच असेल हे शक्य नव्हते. मात्र तांत्रिक तपासात तो बिहारमध्ये असल्याचे समोर आले. त्याला अटक करण्यासाठी एक पथक बिहारमध्ये गेले. तेथेही तीन ठिकाणी पोलीस पोहोचले आणि तो तिघून निघून गेला. त्याच्या शोधार्थ मुक्काम करूवामनी, पोस्ट खरुदाह, जिल्हा किसनगंज, येथे पोलीस पथक पोहोचले होते. मात्र, तो या ठिकाणाहून बिहार नेपाळ सिमेलगत सक्सोल येथील गावी गेल्याने त्याचा शोध घेत अखेर त्याला पकडले. त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. महिलेचा हाताने तोंड बंद करून गळा आवळून तिच्या छातीवर धारदार चाकूने वार करून तिला जिवे ठार केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.