नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने घणसोली सेक्टर ४ येथे उभारण्यात आलेल्या बेघर नागरिकांसाठीच्या शहरी बेघर निवारा केंद्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या केंद्रात राहणाऱ्या महिलांवर मारहाण, दमदाटी, आणि रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत लैंगिक छळाचे प्रयत्न केल्याचा आरोप काही महिलांनी केला आहे.

केंद्रात वास्तव्यास असलेल्या एका बेघर महिलेने हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला असून, यामध्ये निवारा केंद्रातील कर्मचारी दारू पिऊन महिलांच्या शेजारी जबरदस्तीने झोपण्याचा प्रयत्न करत असल्याचे धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. संबंधित महिलेनं महापालिकेकडे वारंवार तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महापालिकेचे अधिकारी डोळेझाक करत असल्याचा आरोप तिने केला आहे.

या महिलेच्या म्हणण्यानुसार, “केंद्रात काम करणारे कर्मचारी महिलांना जबरदस्तीने कामे करायला लावतात, मारहाण करतात आणि त्यांना कोंडून ठेवतात. रात्रीच्या वेळी दारू पिऊन आमच्या रूममध्ये येतात, महिलांच्या हात पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना नको तिथे स्पर्श करतात. याबाबत मी अनेकदा तक्रारी केल्या मात्र इथल्या व्यवस्थाकांनी त्याकडे कायम दुर्लक्ष केलं आहे. अनेक महिलांना आजार झाले असूनही त्यांच्यावर कोणतीही वैद्यकीय मदत दिली जात नाही. महापालिकेच्या कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या निवारा केंद्रात महिलांची अवस्था अतिशय दयनीय आहे.” असे त्या महिलेने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यासोबतच या तीन मजली निवारा केंद्रात महिला व पुरुष यांच्यासाठी राहण्याची वेगळी सोय नसून सगळ्यांना एकत्रच ठेवले जात असल्याची माहितीही महिलेने दिली आहे. त्यामुळे या निवारा केंद्रातील चालणाऱ्या एकूण कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ही महिला व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा मोबाईल हिसकावण्यात आला, दमदाटी करण्यात आली आणि तिच्यावरही बळजबरीचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

नवी मुंबई महापालिकेने बेघर नागरिकांसाठी सुरु केलेल्या या केंद्रातच जर महिलांची सुरक्षितता धोक्यात असेल, त्यांच्यावरच अत्याचार होत असतील, तर त्या महिलांनी नेमकं कुठं जावं? असा सवाल आता उपस्थित होतोय.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी या प्रकाराकडे गंभीर दखल घेतली असून, महापालिकेच्या गोंधळलेल्या प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सगळ्या प्रकारामुळे, महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रांची गुणवत्ता, व्यवस्थापन, आणि महिला सुरक्षेबाबतची बांधिलकी यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या महिलेचं संरक्षण करणार कोण? आणि या प्रकरणी कोण दोषी आहे, याचा शोध घेऊन तत्काळ कारवाई कधी होणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.