आरोपीला मुंब्रा येथून अटक
नवी मुंबई</strong> : आठवडाभरापूर्वी कळंबोलीत एका घरात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली होती. बांगलादेशात पळून गेलेल्या आरोपीला त्याच्या भावाच्या मदतीने पोलिसांनी बोलवून मुंब्रा येथून अटक केली आहे.
मोहम्मद अली मुदस्सर शेख (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तर लिपी सागर शेख असे मृत महिलेचे नाव असून ते दोघे भाडय़ाने घर घेऊन या ठिकाणी राहत होते. ६ डिसेंबर रोजी लिपी हिचा मृतदेह घरातच आढळला होता. गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे शव विच्छेदन अहवालात समोर आले होते. पोलीस आरोपीच्या शोधात होते.
मयत महिला आणि आरोपी यांचे अनैतिक संबंध होते. दोघेही एकत्र राहत होते. मात्र मयत महिला आणि तिच्या पहिल्या पतीचा संपर्क कायम होता, याच्या रोगापोटी आरोपीने गळा दाबून हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी सांगितले. या प्रकरणामुळे बांगलादेशीय नागरिकांचे बेकायदा वास्तव्य पुन्हा एकदा उघड झाले असून पोलिसांनी चार जणांना पारपत्र कायद्यानुसार अटक केली आहे. आरोपीच्या विरोधातही हत्या आणि पारपत्र कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मयत महिला ही बांगलादेशी असून बेकायदा भारतात राहत होती.
हत्या करून आरोपीचे बांगलादेशात पलायन
ही घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली होती. यानंतर आरोपी बांगलादेशात पळून गेला होता. २५ दिवसांनी महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करीत आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले. भावाला आजारी असल्याचे नाटक करावयास लावून विश्वास संपादन करीत आरोपीला पुन्हा परत येण्यास भाग पाडले. आरोपी विमानाने मुंबईत येत मुंब्रा येथे मित्राच्या घरी उतरला. यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली.