नवी मुंबई-नेरुळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून या पार्कचे उद्घाटन ३० जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.परंतू उदघाटनानंतर पहिल्याच दिवशी पार्क बंद होते. त्यामुळे उद्घाटनानंतर पार्क सुरु झाले म्हणून बुधवारी पार्कला लहान मुलांसह भेट देण्यासाठी आलेल्या नागरीकांचा हिरमोड झाला. बुधवारी सकाळपासूनच दिवसभर सातत्याने नागरीक पार्क सुरु झाले मग प्रवेश का नाही अशी विचारणा करण्यात येत होते.परंतू गुरुवारपासून हे पार्क सुरु होणार असल्याची माहिती पालिकेचे शहर अभियंता विभागाने दिली आहे. तर दुसरीकडे या पार्कची वेळ वाढवण्याची मागणी स्थानिक नगरसेवक रविंद्र इथापे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण असलेल्या वंडर्स पार्कचे उद्घाटन मंगळवारी झाल्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मुलांना या पार्कला भेट देण्याची उत्सुकता आहे.त्यामुळे बुधवारी अनेकांनी वंडर्स पार्कला जाण्यासाठी मुलांसह भेट दिली परंतू प्रवेश सुरुच नसल्याने अनेकांनी नाराजी व रागही व्यक्त केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये विविध दुरुस्तीची तसेच नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळांची व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्याच्या हस्ते नव्या रुपात असलेल्या वंडर्स पार्कचे उद्घाटन झाले असून पार्कच्या प्रवेशासाठीचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. परंतू अद्याप पार्कच्या प्रवेशद्वारावर जुनेच दर लावण्यात आले आहेत. सुरवातीला काही दिवस तिकीटपद्धतीने हे नवे दर आकारले जाणार असून ८ दिवसानंतर नागरीकांना उद्यानातील प्रवेश व तिकीटासाठी बॅंकेशी करारनामा करुन स्मार्ट कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता विभागाने दिली आहे. करोनाकाळापासून जवळजवळ ३ वर्षापेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी हे पार्क बंद असल्यामुळे कधी एकदा उद्यान पाहतो यासाठी लहान मुले हट्ट करुन पालकांना घेऊन आल्याचे चित्र पाहायला मिळाले. नव्या रुपात सुरु झालेल्या लेझर शो व म्युझिकल फऊंडनची धमाल अनुभवायला मिळणार असून लेझर शो ,फाऊंडणमध्येच रंगीत पाण्यामध्येच विविध आकार पाहता येणार आहेत. तसेच संगीताच्या तालावर नृत्याचा तालही धरता येणार आहे पण उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी पार्क बंद असल्याने अनेकांची निराशा झाली.त्यातच प्रशासनाकडून वंडर्स पार्क येथे सुरक्षारक्षकांना काहीच सूचना न दिल्यामुळे कधी उद्यान सुरु होणार हे आम्हालाच अजून प्रशासनाकडून काही सांगण्यात आले नसून सकाळ पासून आज उद्यान सुरु नाही असे सांगून सांगून तोंड दुखून आल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगीतले.




उद्यानाची वेळ सकाळी ६ ते दुपारी १२ व सायंकाळी ३ ते सायंकाळी ९ अशी असून ही वेळ वाढवून ९.३० करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली असून याठिकाणी मनुष्यबळही वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.-रविंद्र इथापे, माजी नगरसेवक
उद्घाटनानंतर अंतर्गत व्यवस्थेसाठी व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी बुधवारी उद्यान बंद ठेवण्यात आले होते. गुरुवारपासून वंडर्स पार्क सुरु करण्यात येईल. पार्कच्या वेळ वाढवण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसून काही दिवसानंतर परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.-संजय देसाई, शहर अभियंता
वंडर्स पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यामुळे बुधवारी पार्क सुरु असेल म्हणून मुलाला घेऊन आले परंतू उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी पार्क बंद असल्यामुळे मुलगा नाराज झाला. बुधवारीही या ठिकाणी पार्क कधी सुरु होणार असे काही लिहले नव्हते हे अत्यंत चुकीचे आहे.- प्रणाली राजे, बेलापूर