किरकोळ व्यवसायातून माथाडी कायदा व बाजार समितीचे नियमन वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील माथाडी कामगार रविवारी मध्यरात्रीपासून लाक्षणिक संपावर जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व आमदार नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले.माथाडी भवन येथे शनिवारी झालेल्या माथाडी कामगारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बंदला व्यापारी वर्गानेही पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, ठाणे, कल्याणबरोबरच नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील हजारो माथाडी कामगार या संपात सहभागी होतील. सोमवारी विधिमंडळातही हा मुद्दा मांडण्यात येणार आहे.