पालिकेच्या वाशी संदर्भ रुग्णालयातील सर्व यंत्रे बंद; केवळ ऐरोलीत सुविधा
वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील तीनही क्ष-किरण यंत्रे बंद पडली आहेत. रुग्णालयात एकूण तीन यंत्रे असून त्यापैकी दोन यंत्रे पाच महिन्यांपासून बंद पडली होती. पाच दिवसांपूर्वी उर्वरित एक यंत्रही बंद पडले. त्यामुळे माफक दरातील या सुविधेपासून नागरिकांना मुकावे लागत आहे. सध्या नवी मुंबई पालिकेच्या केवळ ऐरोली येथील रुग्णालयात क्ष-किरण चाचणीची सुविधा सुरू आहे.
वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात रुग्णांना क्ष-किरण चाचणी करण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून येथील तीनपैकी दोन यंत्रे बंद असल्यामुळे उर्वरित एकाच यंत्रावर भार येत होता. आता ते यंत्रही बंद पडले आहे. या रुग्णालयात रोज किमान १०० रुग्ण या सुविधेचा लाभ घेतात. रुग्णांना, आज यंत्र बंद आहे, उद्या या, असे रुग्णालयातील कर्मचारी सांगत आहेत. यंत्र नेमके कधी सुरू होणार हे सांगण्यात येत नसल्यामुळे रुग्णांना हेलपाटे घालावे लागत आहेत.
रुग्णांना झळ
वाशीतील संदर्भ रुग्णालयात नवी मुंबईचे रहिवासी असल्याचा पुरावा दाखवला असता, अवघ्या ७५ रुपयांत क्ष-किरण चाचणी करून घेता येते, तर नवी मुंबईबाहेरील रहिवाशांना १०० रुपयांत सेवा मिळते; मात्र आता ही सुविधा बंद पडल्यामुळे रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयातून चाचणी करून घ्यावी लागत आहे. त्यासाठी जास्त शुल्क भरावे लागत आहे. शिवाय आज यंत्र बंद आहे, उद्या या, असे सांगण्यात येत असल्यामुळे दुरून येणाऱ्यांना प्रवासखर्चही वारंवार करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
स्थायी समितीमध्ये नव्या आणि अत्याधुनिक क्ष-किरण यंत्राला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा करारनामा होणे बाकी आहे. तो होताच लवकरात लवकर हे यंत्र उपलब्ध व्हावे, म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय बंद पडलेली यंत्रेही लवकरच दुरुस्त करून रुग्णांच्या सेवेत आणली जातील.
– दीपक परोपकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी