15 October 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : ‘सत्याच्या प्रयोगा’मागे

स्वत:च्या मनाशी संवाद साधून इतरांना नैतिक मार्गदर्शन करणाऱ्या माणसांमध्ये या प्रकारची बुद्धिमत्ता असते

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

महात्मा गांधी यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव आहे ‘माझे सत्याचे प्रयोग’. हे पुस्तक वाचून त्यांची सत्यप्रिय म्हणून जडणघडण कशी झाली, या संदर्भात त्यांनी स्वत:वरच जे प्रयोग केले त्या प्रयोगांबद्दल सविस्तर लिहिलं आहे.

त्यांच्या लहानपणची ही एक गोष्ट. ते बारा-तेरा वर्षांचे होते. तेव्हा त्यांच्या हातून चूक घडली. आपण ही चूक केली याचा त्यांना अतिशय मानसिक त्रास झाला. हा त्रास सहन होईनासा झाला तेव्हा त्यांनी वडिलांना सांगायचं ठरवलं. पण स्वत:च्या तोंडाने गुन्हा कबूल करण्याची हिंमत नव्हती. त्यामुळे त्यांनी ते लिहून वडिलांच्या हातात दिलं. चिठ्ठी वाचून वडिलांना खूप वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. याचा खूपच सखोल परिणाम झाला. या प्रसंगातून गांधीजींनी जो धडा घेतला तो कायमचाच.

चुका प्रत्येकाकडून होतात. साध्या. कधी गंभीर. पण त्या जाहीररीत्या लिहून काढण्याची ताकद कोणात असते? आपल्या अत्यंत खासगी चुकासुद्धा लिहून प्रसिद्ध करण्याचं धाडस त्यांच्यात होतं. ही त्यांच्या मनाची ताकद होती. म्हणूनच ‘मेरा जीवन एक खुली किताब है’, असं ते म्हणायचे. एकदा त्यांना असं विचारलं की, तुम्ही आधी जे लिहिलंय ते आणि आता जे लिहिलंय ते, यात विसंगती आहे. तेव्हा ते अतिशय प्रांजळपणे म्हणाले, जे मी आता लिहिलंय ते ग्राह्य़ धरा. याचं कारणच असं की, ते स्वत:ला बदलत राहायचे. अधिकाधिक योग्य दिशेकडे न्यायचे. माझं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, असं ते कधीच म्हणाले नाही.

या महात्म्याच्या बुद्धिमत्तेबद्दल काय बोलायचं? स्वत:च्या मनाशी संवाद साधणं ही गोष्ट प्रत्येक व्यक्ती करते, पण या संवादांचं विश्लेषण करणं, त्यातून वैश्विक निष्कर्ष काढणं हे काम वेगळंच आहे. एवढंच नाही तर ती एक बुद्धिमत्ता आहे. या बुद्धिमत्तेचं नाव आहे व्यक्ती-अंतर्गत बुद्धिमत्ता. (intrapersonal intelligence)

स्वत:च्या मनाशी संवाद साधून इतरांना नैतिक मार्गदर्शन करणाऱ्या माणसांमध्ये या प्रकारची बुद्धिमत्ता असते. तत्त्वज्ञानविषयक मांडणी, विश्लेषण करणारे लेखक किंवा वक्ते, मार्गदर्शक. इतरांना योग्य सल्ला देणारे मित्र-मैत्रिणी, अभ्यासाव्यतिरिक्त आपल्या विद्यार्थ्यांच्या जाणिवा विकसित करणारे शिक्षक-प्राध्यापक अशा अनेकांमध्ये ही बुद्धिमत्ता असते.

 

First Published on April 18, 2019 3:10 am

Web Title: about brain function intrapersonal intelligence