कार्बनयुक्त पदार्थापासून तयार झालेल्या पुरातन वस्तूंची वये काढण्यासाठी किरणोत्साराचा वापर करता येतो. वयाच्या मापनाची ही पद्धत कॅलिफोर्निया विद्यापीठातील विलार्ड लिबी याने विकसित केली. पृथ्वीभोवतालच्या वातावरणावर सतत मारा होणाऱ्या वैश्विक किरणांद्वारे वातावरणात ‘कार्बन-१४’ या कार्बनच्या किरणोत्सारी समस्थानिकाची सतत निर्मिती होत असते. त्याचबरोबर या ‘कार्बन-१४’चा किरणोत्सारामुळे ऱ्हासही होत असतो. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडशी होणाऱ्या देवाणघेवाणीमुळे वातावरणात, तसेच सजीवांच्या शरीरात आढळणाऱ्या कार्बनमधील ‘कार्बन-१४’चे प्रमाण समान असते. मात्र, सजीव मृत होताच ही देवाणघेवाण थांबते आणि किरणोत्सारामुळे त्यातील ‘कार्बन-१४’चे प्रमाणही कमी होऊ  लागते. हे प्रमाण किती कमी झाले, यावरून सजीवापासून बनवलेली एखादी कार्बनयुक्त वस्तू किती काळापूर्वीची आहे, ते कळू शकते.

आपल्या संशोधनात लिबीने प्रथम जगातील विविध ठिकाणच्या, विविध उंचीवरील जिवंत सजीवांतील एकूण कार्बनमध्ये ‘कार्बन-१४’चे प्रमाण सारखेच आहे, हे तपासून घेतले. यासाठी त्याच्या अँडरसन या सहकाऱ्याने एकत्रित केलेली माहिती उपयुक्त ठरली. कार्बनमधील ‘कार्बन-१४’चे प्रमाण अत्यल्प असल्याने, त्याच्या मापनासाठी आवश्यक असणारे उपकरणही त्याने विकसित केले. यात कार्बनयुक्त पदार्थाचे एखाद्या वायूत अथवा कार्बनमध्ये रूपांतर केले जायचे आणि त्यातील ‘कार्बन-१४’चे प्रमाण मोजले जायचे. विलार्ड लिबीने आपल्या प्रयोगांची सुरुवात तेलविहिरींतून बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूत ‘कार्बन-१४’ नसल्याची खात्री करून केली. कारण खनिज तेलातील कार्बनची वातावरणातील कार्बनबरोबर देवाणघेवाण लाखो वर्षांपूर्वीच थांबल्यामुळे, त्यातील सर्व ‘कार्बन-१४’च्या अणूंचा आतापर्यंत ऱ्हास होऊन जाणे अपेक्षित होते.

त्यानंतर लिबीने इजिप्शियन संस्कृतीतील, तसेच ग्रीक-रोमन संस्कृतीतल्या ज्ञात काळातील प्राचीन वस्तूंतील ‘कार्बन-१४’चे प्रमाण अभ्यासले. यात पाच हजार वर्षांपूर्वीपासून ते दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळांतील लाकडाच्या, कापडाच्या अनेक वस्तूंचा समावेश होता. या सर्वाची ज्ञात इतिहासावर आधारलेली वये आणि किरणोत्सारी ‘कार्बन-१४’च्या प्रमाणावरून काढलेली वये ही जवळपास सारखीच निघाली. सुमारे तीन हजार वर्षे वय असलेल्या एका मृत वृक्षाचे, त्याच्या खोडावरील वर्तुळांवरून काढलेले वय आणि ‘कार्बन-१४’द्वारे काढलेले वयही सारखे निघाले. लिबीने वापरलेली पद्धत सुमारे ५० हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या वस्तूंचे वय काढण्यासाठी उपयुक्त ठरते. विलार्ड लिबीला या संशोधनासाठी १९६० सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

– डॉ. राजीव चिटणीस

 मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  office@mavipamumbai.org