07 April 2020

News Flash

आक्रमक वर्तन

काही माणसं मात्र कितीही संतापजनक परिस्थिती असून सुद्धा रागवत नाहीत.

 

लहान मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत कोणीही, कधीही आक्रमक होतं. कधीही, कुठेही, एकांतात, किंवा चार लोकांसमोर, जवळच्या प्रिय माणसांसमोर किंवा पूर्ण अनोळखी लोकांसमोर. अशा वागण्यामुळे या लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. कारण कधी ‘पापड मोडेल’ या भीतीखाली इतर लोक असतात.

काही वेळा असं दिसतं की अगदी लहान मुलं – एक वर्षांची मुलंसुद्धा अचानक आक्रमक होतात. भिंतीवर डोकं आपटून, हाताच्या मुठी फरशीवर आपटून संताप व्यक्त करतात. अनेक उदाहरणांमध्ये असं दिसून येतं की लहानपणी किंवा विशेषत: तरुणपणी आक्रमक असणारी माणसं जसं वय वाढत जातं, तशी जास्त समजूतदार होतात आणि इतरांवर जास्त संतापत नाहीत.

या सर्व वेळेला मेंदूतला अमिग्डाला हा भाग उद्दीपित होत असतो. ताणकारक रसायनांमुळे राग हा केवळ राग राहात नाही, तर वेडय़ावाकडय़ा, समाजविसंगत,  अत्यंत चुकीच्या पद्धतीने बाहेर पडतो. काही माणसं मात्र कितीही संतापजनक परिस्थिती असून सुद्धा रागवत नाहीत. शांत राहतात. तर्कसुसंगत उपाय शोधून प्रश्नावर उपाय शोधून काढतात. याचं कारण अमिग्डाला आणि प्री – फ्रंटल कॉर्टेक्स यामध्ये असलेली जोडणी यामध्ये असतं.  प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा भाग नियोजन, व्यवस्थापन, निर्णय क्षमता अशा ‘समजूतदार’ गोष्टींशी संबंधित आहे. त्यामुळे राग आला तरी त्याची प्रतिक्रिया म्हणून संताप फेकणं किंवा आक्रमकता हे साधन (टूल) वापरलं जात नाही.  प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा त्यावर नियंत्रण आणण्याचं महत्त्वाचं कार्य करतो. त्यामुळे ‘मी तापट आहे’, ‘मला खूप राग येतो’, ‘एकदा राग आला की मी काय करेन हे सांगता येत नाही’ अशी वाक्यं काही माणसं फार अभिमानाने ऐकवतात. ही वाक्यं त्या माणसांमध्ये भावनिक नियंत्रण नसल्याचंच निदर्शक आहेत.

लहान मुलांनी जर राग व्यक्त केला तर त्या रागाला घाबरून पड न खाता, तसंच रागाला रागाने प्रतिक्रिया न देता, स्वत:चा प्री फ्रंटल कॉर्टेक्स वापरून राग आणि त्याचं व्यवस्थापन यांची सांगड कशी घालायची, हे मुलांसमोर घडून आलं तर राग येणं ही नैसर्गिक गोष्ट असली तरी त्यावर नियंत्रण ठेवता येतं, हे मुलांना आपसूकच समजेल..

..आणि मोठय़ा माणसांनादेखील त्याची सवय लागेल!

– डॉ. श्रुती पानसे  contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:15 am

Web Title: aggressive behavior akp 94
Next Stories
1 पहिले प्लास्टिक
2 मेंदूशी मैत्री : ताल आणि नाच
3 कुतूहल : वर्णलेखन
Just Now!
X