News Flash

हवादाबमापकाचे काही प्रकार

फॉर्टिनचा हवादाबमापक हा पाऱ्याच्या साध्या हवादाबमापकाचाच एक सुधारित प्रकार आहे.

पाऱ्याच्या साध्या हवादाबमापकामध्ये पाऱ्याच्या स्तंभाची उंची ही पसरट भांडय़ातल्या पाऱ्याच्या पृष्ठभागापासून मोजावी लागते. हवेचा दाब जसा बदलतो, तशी नळीतली आणि पसरट भांडय़ातली पाऱ्याची पातळी बदलते. त्यामुळे पाऱ्याच्या स्तंभाची उंची मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोजपट्टीची पातळीसुद्धा त्यानुसार बदलावी लागते. साध्या हवादाबमापकामध्ये असलेली ही अडचण जीन निकोलस फॉर्टिन या संशोधकाने सन १८०० च्या सुमारास तयार केलेल्या हवादाबमापकाने दूर केली आहे. या हवादाबमापकामध्ये

भांडय़ातल्या पाऱ्याची पातळी वर-खाली सरकवून ती शून्याच्या खुणेला स्पर्श करील, अशी व्यवस्था केलेली असते. फॉर्टिनचा हवादाबमापक हा पाऱ्याच्या साध्या हवादाबमापकाचाच एक सुधारित प्रकार आहे.

समुद्रसपाटीपासून जसेजसे उंच जावे, तसातसा हवेचा दाब कमी कमी होत जातो आणि साहजिकच, पाऱ्याच्या स्तंभाची उंची त्यानुसार कमी होत जाते. समुद्रसपाटीपासून ११० मीटर उंचावर गेल्यास हवादाबमापकातल्या पाऱ्याच्या स्तंभाची उंची १ सेंटिमीटरने कमी होते, असे आढळते. यावरून हवादाबमापकाचा वापर एखाद्या ठिकाणची समुद्रसपाटीपासून असलेली उंची काढण्यासाठीसुद्धा केला जाऊ शकतो, हे स्पष्ट होते.

पाऱ्याचा हवादाबमापक ने-आण करण्यासाठी गरसोयीचा असल्याने ‘निद्र्रव हवादाबमापक,’ म्हणजेच कोणत्याही द्रवपदार्थाचा समावेश नसलेला हवादाबमापक वापरला जातो. या हवादाबमापकामध्ये अंशत: निर्वात केलेली पत्र्याची डबी असते. डबीमध्ये अत्यंत कमी हवा असल्याने बाहेरच्या हवेचा दाब वाढला, की त्या दाबामुळे डबी आतल्या बाजूला दबली जाते. बाहेरचा दाब सामान्य झाला की डबी पुन्हा पूर्ववत होते. दाबातल्या फरकामुळे होणारी डबीची ही हालचाल दाखवणारा काटा एका तबकडीवर फिरतो. या

तबकडीवर हवेचा दाब दाखवणाऱ्या खुणा आणि आकडे असतात. यावरून हवेचा दाब समजतो.

–  हेमंत लागवणकर 

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

फिराक गोरखपुरी यांचे ज्ञानपीठभाषण..

१९६९चा ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात फिराक गोरखपुरी म्हणतात- ‘‘कवी, साहित्यिक आणि महान कलावंत यांची कीर्ती खूप काळ टिकून राहते आणि अधिक व्यापकही होते.. कालिदासाची आठवण आजही ताजी आहे. तितकीच विक्रमादित्याची आठवणही ताजी आहे. फिरदौसी, शेक्सपीअर, वर्डस्वर्थ, कोलरिज, कीट्स, शेली आणि बायरन ही नावं अमर आहेत. पण हे आपल्याला फ्रान्सच्या क्रांतिकारकांमध्ये आढळत नाही. थोडं मागे गेलं तर मिल्टन, जॉन्सन आणि गोल्डस्मिथ यांच्या साहित्यकृती जितक्या सजीव आहेत तितके सजीवपण त्यांच्या काळातील कर्मवीरांना प्राप्त झालेलं नाही.  कवी, कलाकारांच्या कीर्तीसमोर दुसऱ्यांची ख्याती केवळ उडत्या धुळीसमान भासते. मग ते धुळीचे ढग काही काळ आभाळाला टेकले असले तरीही कवी आणि कलाकारांच्या आठवणी अमर आणि सदाबहार असतात. कारण त्यांच्या कलाकृती जीवनातील अटळ, अमर मान्यतांना वाणी देतात. प्रतिध्वनित करतात.

‘‘घरगुती जीवन आणि त्यांच्या संबंधातील साधारण गोष्टी, परिचित दृश्य, नदी-नाले, फळांच्या बागा, लहरणारी शेतं आणि खेळणी ज्यांना कुणाला मी स्पर्श करीत होतो, पाहत होतो, ऐकत होतो, ज्यांचा मी अनुभव घेत होतो. त्यात एक आंतरिक जीवन आहे आणि तेच एक सत्य आहे- असा माझा अनुभव होता. माझा हा अनुभव व्यक्तिगत अनुभव नाहीए. तर हिंदु संस्कृतीचा आधार हाच अनुभव आहे. निसर्गाच्या कणाकणाशी रक्ताचं नातं अनुभवणं, प्रत्येक वस्तूशी आपलं एकतेचं नात प्रस्थापित करणं आणि त्यातून शांतीचा, आनंदाचा अनुभव घेणं, ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे.. .. माझा तर हा अनुभव आहे की, हिंदू समाज हा एकमुक्त समाज आहे. यात काही शेतकरी आहेत, काही व्यापारी, काही भांडवलदार तर काही समाजवादी आहेत. केवळ हिंदू संस्कृती मतमतांतराच्या बंधनातून आमची सुटका करते.’’

‘‘निसर्ग, बालजीवन, स्त्रीत्व, घरचं जीवन, सामाजिक जीवन हे सगळे हळूहळू माझ्या कवितेचे विषय बनत गेले. मानवाची गाथा, संस्कृतीची कहाणी, इतिहासातील महान क्रांत्या याही माझ्या कवितांचा विषय बनल्या. इतिहासातील शक्ती माझ्या प्रतिभेला आपल्याकडे आकर्षित करू लागली. काव्यरचना करणं म्हणजे व्यक्तिगत सुख-दु:खाची सूची तयार करणं नव्हे, तर मानवी सुखदु:खाची व्याख्या करणं होय.’’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2017 1:25 am

Web Title: air pressure measurement types
Next Stories
1 पाऱ्याचा हवादाबमापक
2 कुतूहल  : दाबमापनाची एकके
3 आल्फ्रेड बिनेत: बुद्धिमत्ता मोजपट्टीचा जनक
Just Now!
X