रसायनशास्त्राच्या क्षेत्रात आयुपॅक (IUPAC) या संस्थेने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ज्यात मूलद्रव्ये व रेणू यांचे नामकरण, अणुभाराचे प्रमाणीकरण, भौतिक स्थिरांकाचे प्रमाणीकरण, वस्तुमानाच्या गुणधर्माच्या माहितीचे संपादन करणे, संशोधन पत्रिकेची तपासणी करणे व त्यांच्या पुनरावृत्तीची दखल घेणे, समाजाच्या सेवेसाठी वैश्विक प्रश्नाची दखल घेऊन, रसायनशास्त्रातील संशोधनाचा वापर करणे या सूचनांचा समावेश आहे.

मूलद्रव्यांचे नामकरण करताना निरनिराळ्या रूपांनी त्यांची विभागणी करण्यात आली. ते वर्गीकरण असे होते : पौराणिक सर्वसाधारण कल्पना किंवा प्रसिद्ध व्यक्ती, खनिज किंवा त्या प्रकारचा पदार्थ, भौगोलिक प्रदेश किंवा जागा, मूलद्रव्याचे गुणधर्म आणि शास्त्रज्ञाचे नाव.

रासायनिक मूलद्रव्यांना बहुधा संशोधकाचे नाव दिले जाते, १९४० नंतर शोधलेल्या मूलद्रव्यांच्या बाबतीत मात्र असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. युरेनियमनंतरच्या (transuranic) काही मूलद्रव्यांना नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे देण्यात आली. उदाहरणार्थ, बोहरीअम (नील्स बोहर), क्युरिअम (मेरी व पिअरी क्युरी),आइनस्टेनिअम (अल्बर्ट आइनस्टाइन), फर्मिअम (एनरिको फर्मी), राँजेनिअम (विल्यम राँजेन). याप्रमाणेच या गटात सामाविलेल्या काही मूलद्रव्यांना नोबेल पारितोषिक न मिळालेल्या शास्त्रज्ञांची नावे दिली आहेत. उदाहरणार्थ कोपरनिसिअम (निकोलस कोपरनिकस), मेंडेलीव्हिअम (दिमित्री मेंडेलीव्ह), नोबेलिअम (आल्फ्रेड नोबेल), माइटनिरिअम (ऑस्ट्रीयन भौतिकतज्ज्ञ लीस माइटनर).

याचप्रमाणे काही मूलद्रव्यांना निरनिराळ्या राष्ट्रांची,  प्रांतांची किंवा शहरांची नावे दिली आहेत. जसे पोलंड या शहरावरून पोलोनियम, फ्रान्सवरून फ्रान्सिअम, गॅलियम (लॅटिनमधे गॅलिआ हा पश्चिम युरोपातल्या धातुयुगातील एक प्रांत), जर्मनीवरून जम्रेनिअम, अमेरिकेवरून अ‍ॅमरिसिअम,  कॅलिफोíनअम, अमेरिकेतील बर्कले या शहरावरून बíकलिअम आणि युरोपवरून युरोपीअम. यात उत्तर युरोपमधील स्कॅनडेव्हिया या भागातील बऱ्याचशा शहरांची नावे मूलद्रव्यांना दिलेली आढळतात. इटरबी या स्वीडिश गावावरून इट्रिअम, अर्बअिम, टर्बअिम या मूलद्रव्यांना नावे देण्यात आली, कारण त्यांच्या खनिजांच्या खाणी प्रथम त्या गावी सापडल्या. होलमीअम होलमीया या स्टॉकहोमच्या लॅटिन नावावरून, तर थुलियम हे आर्ट्रिक प्रदेशातील ग्रीक शब्दांवर (उल्टीमा थुले) बेतलेले आहे.

याप्रमाणेच जुन्या लॅटिन नावाचाही वापर करण्यात आला. हाफ्निअम या मूलद्रव्याचे नाव, कोपनहेगन या शहराचे लॅटिन नाव आहे, तर ल्युटेनिअम हे पॅरिसचे लॅटिन नाव! काही मूलद्रव्यांना सूर्यमालेतील ग्रहांवरून नावे देण्यात आलेली आहेत. युरेनस ग्रहावरून युरेनिअम, नेपच्यूनवरून नेपच्यूनिअम आणि प्लूटोवरून प्लूटोनिअम.

– डॉ. द. व्यं. जहागीरदार, मुंबई</strong>

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org