‘कुतूहल’ सदरातला या वर्षीचा हा शेवटचा लेख. या वर्षीचे ‘कुतूहल’ हे ‘शोधांच्या मागोव्या’वर आधारलेले होते. या सदरातून विज्ञानातील आणि तंत्रज्ञानातील, पुरातन काळापासून आजच्या काळापर्यंतच्या महत्त्वाच्या शोधांचा मागोवा घेतला गेला. हा मागोवा संशोधनकेंद्रित होता. त्यामुळे यात वैज्ञानिकांच्या वैयक्तिक माहितीवर भर न देता, त्यांच्या संशोधनावर भर दिला गेला. या मागोव्यात शोधाबरोबरच त्या त्या शोधामागील विज्ञानाची ओळखही करून दिली. ही ओळख शक्य तितक्या सोप्या भाषेत आणि मर्यादित शब्दांत करून देणे, हे ‘कुतूहल’च्या लेखकांच्या दृष्टीने आव्हानात्मक काम होते. ‘कुतूहल’च्या लेखकांनी हे आव्हान व्यवस्थित पेलले असल्याचे, सदराला मिळालेल्या उत्तम प्रतिसादावरून दिसून येत आहे.

या सदरात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांसारख्या विषयांपासून ते गणित, संगणकशास्त्र, तंत्रज्ञान अशा अनेक विषयांतील संशोधनाचा परामर्श घेतला गेला. या विविध विषयांतील महत्त्वाच्या शोधांची सुमारे अडीचशे लेखांद्वारे माहिती देताना, ते संशोधन प्रत्यक्ष कसे केले गेले, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळात एखादे सहजसोपे वाटणारे संशोधन हे त्या काळच्या परिस्थितीत कसे केले गेले, हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. संशोधनाच्या तपशिलावरून त्या संशोधकाची शोधामागची भूमिका काय होती, याची कारणमीमांसाही अधिक योग्यरीत्या करता येते. विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास टप्प्याटप्प्याने होत असतो. त्यातही काही संशोधने ही विज्ञानाला वेगळे वळण देणारी असतात. अशा बाबतीत तर ही कारणमीमांसा अधिकच महत्त्वाची ठरते.

‘कुतूहल’च्या या वर्षीच्या सदरातून हे सर्व साधताना शब्दांच्या मर्यादेमुळे लेखांतील भाषेचा आकर्षकपणा योग्यरीत्या राखता आला नाही, याची जाणीव आहे. तसेच काही ठिकाणी संशोधनाची माहिती विस्तारभयास्तव अतिशय मर्यादित स्वरूपाची ठेवावी लागली. मात्र, या मर्यादित शब्दांच्या छोटय़ा लेखांमुळे अनेक वाचकांचे या शोधांबद्दलचे कुतूहल चाळवले गेले असल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून येत होते. किंबहुना सदराचे हे छोटेखानी स्वरूपच सर्वसामान्य विज्ञानप्रेमींत ‘कुतूहल’ सदर लोकप्रिय होण्यास कारणीभूत ठरते आहे. ‘लोकसत्ता’त गेली अनेक वर्षे प्रकाशित होणाऱ्या या सदराचा, ‘वैज्ञानिक कुतूहल जागृत करणे’ हा उद्देश यामुळे साध्य होत आहे. वैज्ञानिक शोधांचा मागोवा घेणाऱ्या या २०१९ सालच्या ‘कुतूहल’ सदराच्या वाचकांचा निरोप घेताना, ‘मराठी विज्ञान परिषद’तर्फे नव्या वर्षांच्या शुभेच्छा!

– डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org