News Flash

अरब-इस्रायल संघर्ष

१९४८ या काळात जेरुसलेम ब्रिटिश नागरी प्रशासनाखाली राहिले.

४०० वष्रे तुर्कस्तानच्या ओटोमन सत्तेखाली असलेले जेरुसलेम पुढे पहिल्या महायुद्धानंतर १९१७ साली ब्रिटिश राजवटीखाली गेले. १९१७ मध्ये ब्रिटिश लष्करी अधिकारी जनरल अ‍ॅलनबी याने ब्रिटिश सरकारच्या वतीने जेरुसलेम ताब्यात घेतल्यानंतर पुढे पाच वष्रे म्हणजे १९२२ पर्यंत तिथे लष्करी प्रशासन राहिले. लीग ऑफ नेशन्स दुसऱ्या महायुद्धाआधीच्या जागतिक संघटनेने दिलेल्या निवाडय़ाअन्वये इ.स. १९२२ ते १९४८ या काळात जेरुसलेम ब्रिटिश नागरी प्रशासनाखाली राहिले.

या ब्रिटिश सत्ताकाळात ब्रिटिश गव्हर्नर रोनाल्ड स्टॉर यांनी शहराच्या तटबंदीची दुरुस्ती करून जेरुसलेम हिब्रू युनिव्हर्सटिी स्थापन केली. १९२० साली नबी मुसाच्या दंगलींमुळे अरब-इस्रायल संघर्षांला प्रथमच तोंड फुटले. १९४६ साली इरगुन लुमी या झियानिस्ट दहशतवादी संघटनेने किंग डेव्हिड हॉटेल बॉम्बने उडवून दिले. यात २८ ब्रिटिश अधिकारी मारले गेले. ब्रिटिशकाळात अरब  व इस्रायलवाद्यांचे आपसात वैमनस्य होते तसेच ब्रिटिशांविरुद्धही दोघांचे वैर होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्णयाअन्वये १४ मे १९४८ रोजी इस्रायलचे पॅलेस्टाइन आणि इस्रायल असे दोन भाग करण्यात आले आणि या दिवशी इस्रायल हे ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र घोषित झाले. याबरोबरच जेरुसलेमचेही दोन भाग झाले. जेरुसलेममधील पूर्वेकडचा भाग अरबांना तर पश्चिमेकडचा इस्रायलचा झाला.  याच वेळी जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी घोषित झाली. या काळात इर्गुन, हॅगनाह, लेही वगरे इस्रायलच्या तर अल फताह, अरब इररेग्युलर्स, पीएलओ या अरबांच्या गुप्त संघटनांनी एकमेकांविरोधी दहशतवादी कृत्ये चालू ठेवली व त्यातून १९६७ चे अरब लीगविरोधी इस्रायलचे सहा दिवसांचे युद्ध झाले. या युद्धात अरब लीगच्या फौजांचा पराभव करून इस्रायलने अरब क्वार्टर्स म्हणजे अरबांच्या वस्तीचे पूर्व जेरुसलेम आपल्या शासनाखाली आणून संपूर्ण जेरुसलेमचा ताबा घेतला.

१९८० साली इस्रायली पार्लमेंटमध्ये ‘एकत्रित जेरुसलेम शहर’ ही इस्रायली राष्ट्राची राजधानी घोषित झाली. नेसेट म्हणजे पार्लमेंट जेरुसलेममध्येच भरवली जाते. परंतु अमेरिका, युरोपीय राष्ट्रांचे दूतावास आणि इतर महत्त्वाची कार्यालये मात्र तेल अवीव या शहरातच आहेत.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

शमी

शमी हा मध्यम आकाराचा बाभळीसारखा दिसणारा वृक्ष. भारतात प्रामुख्याने राजस्थान, हरियाणा, गुजरात या ठिकाणी असलेल्या उष्ण आणि कोरडय़ा हवामानात मुबलक प्रमाणात आढळतो.

साधारण ६ ते ८ मीटर उंच वाढणारा हा काटेरी वृक्ष आहे. बाभळीपेक्षा मोठय़ा असलेल्या फांद्या खाली लोंबकळताना वेगळाच भास निर्माण करतात. पाने संयुक्त प्रकारातील असतात. डिसेंबर ते मार्च या काळात फिकट पिवळ्या रंगाची फुले ८ ते १० सें.मी. लांब तुऱ्यात येतात. शेंगा फरसबीसारख्या पण नाजूक असतात. वाळल्यावर भुरकट रंगाच्या होतात. लेग्युमिनेसी या कुलातील या वृक्षाचे वनस्पती शास्त्रीय नाव प्रोसोपिस सिनेरारीया असे आहे.

पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या वृक्षाची दसऱ्याला पूजा करून सीमोल्लंघन करतात. काही ठिकाणी दसऱ्याला सोने म्हणून याच वृक्षाची पाने दिली जातात. शमीची पाने गणपती पूजेचा एक अविभाज्य भाग समजला जातो, परंतु कमी उपलब्धता आणि न ओळखता येणे या कारणामुळे बाभळीची पाने शमीऐवजी वापरली जातात. या वृक्षाचे लाकूड शेतीसाठी अवजारे करण्यासाठी वापरले जाते.

शमी हा राजस्थानाचा राज्यवृक्ष आहे. बहारीनच्या वाळवंटी प्रदेशात ४०० वर्षे जुन्या बाभळीच्या वृक्षाची नोंद आहे.

या वृक्षाची मुळे खोलवर जाऊन जमिनीतील पाणी शोषून घेतात. खाऱ्या जमिनीतही हा वृक्ष वाढतो. १५० मि.मी.पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशातही हा वृक्ष तग धरू शकतो. शमी वृक्षाच्या मुळांमध्ये नायट्रोजन स्थिर करण्याची क्षमता असल्याने बाजरी, ज्वारीच्या शेतात हा वृक्ष मुद्दामहून लावला जातो. मुळे खोल जमिनीतून पाणी शोषून घेतात. त्यामुळे पृष्ठाजवळील पाणी घेणाऱ्या पिकाच्या पाणीपुरवठय़ात अडथळा येत नाही.

वाळवंटात जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शमीच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात मदत होते. राजस्थानात शमीच्या वृक्षाला खेजडी म्हणतात. ‘ शेंगाची भाजी करतात. शमीची भाजी त्या प्रदेशाचे वैशिष्टय़ म्हणून ओळखले जाते. तिथे हा वृक्ष सदाहरित असल्याने ग्रीष्म ऋतूत आल्हाद देणारा आहे.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 3:10 am

Web Title: arab israeli conflict
Next Stories
1 जेरुसलेम-एन्डलेस क्रुसेड्स
2 अभिनेत्री नादिरा बगदादचीच
3 सद्दाम हुसेनचा उदयास्त
Just Now!
X