अनघा वक्टे

युरेनिअमोत्तर मूलद्रव्यांचे शोध तसेच मूलद्रव्यांच्या गुणधर्माच्या व अणुरचनेच्या अभ्यासातील अग्रणी संशोधक म्हणून ग्लेन सीबोर्ग यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म अमेरिकेतील मिशिगन प्रांतातील इशपेमिग या गावातला! लॉस एंजेलिस विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेतल्यावर, पुढील शिक्षणासाठी त्यांनी बर्कले येथील कॅलिफोíनया विद्यापीठात प्रवेश घेतला. पीएच.डी. नंतर बर्कले येथेच गिल्बर्ट लुइस यांचे सहायक संशोधक म्हणून ते कार्यरत झाले. १९४१मध्ये लिव्हिगहूड यांच्यासमवेत समस्थानिकांविषयी त्यांनी संशोधन केले. ३७ इंचाच्या सायक्लोट्रोनचा उपयोग करून आयोडीन-१३१ सारखी समस्थानिके त्यांनी शोधली. ही समस्थानिके वैद्यकशास्त्रात रोगनिदान आणि उपचारासाठी उपयुक्त ठरतात हे त्यांनी सिद्ध केले.

केंद्रकीय विखंडनाचा शोध १९३९ मध्ये ऑटो हॉन आणि स्ट्रॉसमन यांनी लावला; त्यानंतर सीबोर्ग यांनीही, बर्कले विद्यापीठात केंद्रकीय विखंडनावर संशोधन सुरू केले. एडविन मॅकमिलन आणि फिलिप एबलसन यांनी प्रयोगशाळेतील पहिले मूलद्रव्य नेपच्युनिअम तयार केले आणि या यशानंतर मॅकमिलन यांनी पुढील युरेनिअमोत्तर मूलद्रव्यांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले. दुसऱ्या महायुद्धात मात्र युद्धविषयक संशोधनाची जबाबदारी मॅकमिलन यांच्याकडे आल्याने, त्यांनी हे काम थांबविले. सीबोर्ग यांनी मॅकमिलनच्या परवानगीने संशोधनाचे कार्य पुढे सुरू ठेवले. १९४१मध्ये प्लुटोनिअम-२३८ हे समस्थानिक अलग करण्यात सीबोर्ग यशस्वी झाले. प्ल्युटोनिअम या जड मूलद्रव्याचा वापर अण्वस्त्रांमध्ये करता येईल हे त्यांनीच सिद्ध केले.

मानवाने तयार केलेल्या ट्रान्सयुरेनिअमच्या दहा मूलद्रव्यांच्या संशोधनात सीबोर्ग यांचा सिंहाचा वाटा आहे. प्लुटोनिअम, अमेरिशिअम, क्युरिअम, बर्केलिअम, कॅलिफोíनअम, आइन्स्टाईनिअम, फर्मिअम, मेंडेलिव्हिअम, नोबेलिअम आणि सीबोíगअम ही ती मूलद्रव्ये. सुरुवातीला शोधलेल्या मूलद्रव्यांची नावे शास्त्रज्ञांच्या नावावरून आणि ती जिथे शोधली त्या बर्कली, कॅलिफोíनया या शहरांच्या नावावरून देण्यात आली. सीबोर्गने शोधलेल्या शेवटच्या मूलद्रव्याला त्यांचे नाव देण्यात आले. वैज्ञानिक जिवंत असताना त्याचे नाव एखाद्या मूलद्रव्यास देण्याची ही पहिलीच घटना होती. स्वत: सीबोर्ग यांना हा सन्मान नोबेल पारितोषिकापेक्षाही श्रेष्ठ वाटत होता.

सीबोर्ग यांनी अ‍ॅक्टिनाइड श्रेणी विकसित केली आणि या श्रेणीला आवर्तसारणीत लॅन्थेनाइडच्या खाली स्थान दिले गेले. मेंडेलिव्हच्या काळानंतर आवर्तसारणीत एवढे मोठे फेरबदल होण्यास सीबोर्ग कारणीभूत ठरले.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org