डॉ. यश वेलणकर

माणसाच्या स्वत:कडून अपेक्षा असतात, तशाच इतरांकडूनही अपेक्षा असतात. बऱ्याच जणांनी आदर्श वागण्याच्या काही चौकटी बनवलेल्या असतात. ती माणसे त्यानुसार वागत असतात; पण साऱ्यांनी तसेच वागले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. तो पूर्ण झाला नाही, की माणसे अस्वस्थ होतात. मी मनमोकळे बोलते/बोलतो तसे सर्वानी बोललेच पाहिजे, असा दुराग्रह असतो. त्या वेळी असे न बोलणाऱ्या माणसाला ‘आतल्या गाठीचा’ असे लेबल लावले जाते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, त्याला/तिला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात, हे लक्षात घेतले जात नाही. विवेकनिष्ठ मानसोपचारामध्ये असे दुराग्रह शोधले जातात. प्रत्येक माणसाच्या मनात असे काही दुराग्रह असू शकतात. त्या माणसाला ते दुराग्रह वाटत नाहीत, पण दुसऱ्या माणसाला वाटू शकतात. साक्षीभाव ठेवून स्वत:च्या मनातील विचार पाहू लागलो, तर असे अविवेकी हट्ट स्वत:चे स्वत:लाच समजू शकतात. ‘मला खोटेपणा अजिबात सहन होत नाही’ असे अनेक जण सांगतात. खोटेपणा वाईटच हे मान्य करूनदेखील, माणसे खोटे बोलतात. काही जणांचा फुगवून सांगण्याचा स्वभाव असतो, काही जण त्रास टाळण्यासाठी थापा मारतात. काही जणांना दुसऱ्याला फसवण्यात विकृत आनंद मिळतो. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’ अशा अनेक म्हणी हे सत्य सांगत असतात; पण त्याचा विसर पडतो. प्रत्येक वेळी आपल्याला न्यायाधीश होण्याची, दुसऱ्याचे चुकीचे वागणे दाखवून देण्याची गरज असतेच असे नाही.

पण रागाच्या भरात माणसे बेभान होतात, भांडतात. माणसांनी असे‘च’ असले पाहिजे, वागले‘च’ पाहिजे हा ‘च’ त्रासदायक असतो. प्रत्येकाची मूल्ये वेगवेगळी असतात. कुणासाठी व्यवस्थितपणा हे मूल्य असते, कुणासाठी नसते. त्याच्यासाठी सर्जनशीलता हे मूल्य असू शकते. मला कुणीही नाव ठेवताच कामा नये, हाही अविवेकी समज आहे. जगात प्रत्येक माणसावर दोषारोप झालेले आहेत. दुसऱ्या माणसांनी कसे वागावे आणि काय बोलावे हे आपल्या नियंत्रणात नाही, हे पटले की अपेक्षांचा दुराग्रह कमी होतो. तसेच स्वत:चा आनंद इतरांच्या वागण्यावर अवलंबून ठेवला नाही, की अस्वस्थता कमी होते.

yashwel@gmail.com