योगेश सोमण

रशिया, अमेरिका आणि जर्मनीस्थित प्रयोगशाळेत नवीन मूलद्रव्य शोधण्यासाठी वेगवेगळे शास्त्रज्ञ संशोधन करीत होते. या मूलद्रव्याच्या बाबतीत मात्र रशियातील जे.आय.एन.आर. प्रयोगशाळेत युरी ओग्नेसिअन या शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली रशियन शास्त्रज्ञांनी आणि अमेरिकेच्या लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी एकत्र संशोधन केले. या शास्त्रज्ञांच्या संयुक्त प्रयत्नाने केलेल्या प्रयोगात ११५ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याचे अस्तित्व नोंदले गेले. २००३ साली अमेरिशिअमवर कॅल्शिअमच्या अणुंचा मारा करून ११५ अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्याचे चार अणू तयार करण्यात आले. प्रयोगाची माहिती २००४ मध्येच प्रकाशित केली गेली. परंतु आयुपॅकने या मूलद्रव्याचे अस्तित्व मान्य करून नामकरण करायला २०१६ साल उजाडले. मॉस्को शहरातील प्रयोगशाळेत निर्माण झालेल्या या मूलद्रव्याला मॉस्को शहराच्या नावावरून मॉस्कोव्हिअम असे नाव दिले. आयुपॅकच्या नामकरण पद्धतीनुसार या मूलद्रव्याचे नाव अनअनसेप्टिअम तर मेंडेलीवने दिलेले नाव इका-बिस्मथ असे होते.

२८७ ते २९० अणुभार असलेली मॉस्कोव्हिअमची चार समस्थानिके आढळली आहेत आणि ती अत्यंत अस्थिर आहेत. या सर्वाचा अर्धायुष्यकाल काही सेकंदाचाच आहे. या चार समस्थानिकांपैकीसर्वात स्थिर समस्थानिक मॉस्कोव्हिअम-२९०, याचा अर्धायुष्यकाल ०.८ सेकंदाचा आहे. नायट्रोजन, फॉस्फरस या मूलद्रव्यांच्या गटात असलेल्या मॉस्कोव्हिअमचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मही या मूलद्रव्यांप्रमाणेच असण्याची अटकळ आहे.

जास्त अणुभारामुळे बाहेरच्या कक्षांतील इलेक्ट्रॉन्सवर सापेक्षवादाच्या परिणामामुळे काही फरक पडून रासायनिक गुणधर्मामध्ये फेरफार झाले तरी आधीच्या बिस्मथप्रमाणेच मॉस्कोव्हिअम सामान्य तापमानाला धातुरूपात असेल असे गणिताने सुचविले आहे. अर्थात आजपर्यंत फक्त १०० / २०० अणूच तयार करण्यात आल्यामुळे मॉस्कोव्हिअमचे कुठलेही गुणधर्म प्रत्यक्षात पडताळून पाहता आले नाहीत. या कृत्रिम आणि किरणोत्सारी मूलद्रव्याची मिळणारी अल्प अणू संख्या आणि अत्यल्प अर्धायुष्यकाल या दोन्ही गोष्टींमुळे संशोधनाव्यतिरिक्त याचा कोणताही उपयोग नाही.२००३ मध्ये शोधण्यात आलेल्या ११५ अणुक्रमाकांच्या मूलद्रव्याचा वापर विज्ञान कथांवर आधारीत हॉलीवूडच्या सिनेमांमध्ये आणि अमेरिकेतील चित्रवाणी मालिकांमध्ये १९८०च्या दशकापासूनच सुरू झाला. परग्रहवासीयांच्या यानांमध्ये इंधन, सजीवांमध्ये क्षणार्धात उत्क्रांती घडवून आणणारे मूलद्रव्य, कालप्रवास करण्यासाठी कालयंत्रात आवश्यक असलेला धातू; इतक्या वेगवेगळ्या काल्पनिक उपयोगांसाठी ११५ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याचा उल्लेख झालेला आढळतो.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org