News Flash

निरोगी अन् आनंदी जीवनाकडे..

साठच्या दशकाच्या आसपास, मानसिक तणावाचा परिणाम शरीरावर होतो हे लक्षात येऊ लागले.

मनाचा वेध आणि मनाला बोध करण्याचा प्रयत्न अनेक तत्त्वज्ञ, संत यांनी केला आहे. साधारण दीडशे वर्षांपूर्वी ‘मानसशास्त्र’ हे आधुनिक विज्ञानाची एक शाखा म्हणून विकसित होऊ लागले. १८७९ साली जर्मनीमध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू झाली. त्याच वेळी आधुनिक मानसोपचार पद्धती जन्माला आली. सिग्मंड फ्रॉइड यांनी अनेक नवीन संकल्पना मांडत या शास्त्राची पायाभरणी केली.

त्यानंतर मानसोपचार पद्धतीमध्ये अनेक बदल होत गेले. फ्रॉइडच्या मनोविश्लेषण पद्धतीनंतर, वर्तन-चिकित्सा म्हणजे ‘बिहेव्हिअर थेरपी’ आणि चिंतन-चिकित्सा म्हणजे ‘कॉग्निटिव्ह थेरपी’ उपचार म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. आता त्यामध्ये ध्यानाचा उपयोग करून घेऊन केल्या जाणाऱ्या ‘माइंडफुलनेस थेरपीज्’ची भर पडली आहे.

साठच्या दशकाच्या आसपास, मानसिक तणावाचा परिणाम शरीरावर होतो हे लक्षात येऊ लागले. मग त्यावर संशोधन होऊ लागले. डॉ. हर्बर्ट बेन्सन यांनी- ध्यानाचा परिणाम शरीरावर होतो, याचे आधुनिक परिभाषेत संशोधन करून ‘द रिलॅक्सेशन रिस्पॉन्स’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यानंतर मनाचा परिणाम म्हणून शरीरात व्याधी कशा होतात, याविषयी संशोधन करणारे अनेक संशोधक आहेत. ‘सायकोन्यूरोकार्डिऑलॉजी’ म्हणजे मनाचा परिणाम हृदयावर आणि ‘सायकोन्यूरोइम्युनोलॉजी’ म्हणजे मनाचा परिणाम रोग प्रतिकारशक्तीवर कसा होतो, हे शोधणाऱ्या दोन विशेष शाखांमध्ये सध्या बरेच संशोधन सुरू आहे.

एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर मानवी मेंदूचा अभ्यास अधिक वेगाने होऊ लागला आणि ‘न्यूरोसायन्स’ ही विज्ञानशाखा वेगाने प्रगती करू लागली. एखादा माणूस खूप चिडला असेल किंवा ध्यान करत असेल, त्या वेळी त्याच्या मेंदूत काय घडत असते, हे आता समजू लागले आहे.

या सर्व ज्ञानाचा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यात होणे आवश्यक आहे. तसे झाले तरच आपल्याला अधिक निरोगी आणि आनंदी जीवन अनुभवता येईल. हे कसे शक्य आहे, याचीच चर्चा आपण या सदरात करणार आहोत.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 3:55 am

Web Title: article manovedh akp 94
Next Stories
1 पर्यावरण
2 मैत्री
3 ‘मागोव्या’चा मागोवा..
Just Now!
X