आपल्या मनात सतत विचार येत असतात. विचार निर्माण करणे हेच मेंदूचे कार्य आहे. साक्षीध्यान म्हणजे विचार थांबवण्याचा प्रयत्न न करता त्यांच्या पासून अलग होऊन कोणतीही प्रतिक्रिया न करता त्यांना पाहायचे. त्याचा सराव करण्यासाठी दहा मिनिटे काढायची आणि शांत बसायचे. श्वासाची नैसर्गिक हालचाल जाणत राहायची. अधिक काल आपले मन श्वासावर राहत नाही, ते विचारात भरकटते. ज्या वेळी हे लक्षात येईल त्या वेळी नोंद करायची आणि लक्ष पुन्हा श्वासावर आणायचे.

असे करू लागलो, की मन विचारात भरकटले हे भान लवकर येऊ लागते. एक-दोन विचार मनात आले, की समजू लागतात. आता त्या विचारांना हा पापी, हा घाणेरडा, हा निगेटिव्ह असे लेबल न लावता तो विचार किती वेळ राहतो हे उत्सुकतेने पाहत राहायचे. भीतिदायक विचार शरीरातदेखील संवेदना निर्माण करतो. छातीत धडधड जाणवू लागते. ती धडधडदेखील ‘ही नको’ अशी प्रतिक्रिया न करता जाणत राहायची. शरीराकडे आणि मनाकडे साक्षीभाव ठेवून पाहायचे. असे करू लागलो, की आपल्या मनात किती कचरा साठलेला आहे हे जाणवते.

विचारात गुंतून न जाता त्याच्यापासून वेगळे होऊन म्हणजेच साक्षीभाव ठेवून ते पाहू लागतो त्या वेळी सुप्त मन स्वच्छ होऊ लागते. आपण शरीराचा कचरा रोज आतून-बाहेरून स्वच्छ करतो. त्यासाठी संडासात जातो, आंघोळ करतो. पण मनाचा कचरा साफ करण्याची आपल्याला माहितीच नाही. त्यामुळेच तणावजन्य शारीरिक आजार आणि डिप्रेशन वाढत आहे. अध्यात्म सांगणाऱ्या सर्व उपासना पद्धतींमध्ये शरीर मनाची सजगता वाढवणारे उपाय सांगितलेले आहेत. कोणतीही पूजा करताना डोक्याला,छातीला हात लावायचा असतो, त्याला न्यास म्हणतात. हे शरीराकडे लक्ष नेण्यासाठीच आहे. शंकराचार्याचे निर्वाण षटक ‘मी शरीर/मन नाही’ याचे स्मरण करून देणारे आहे. मात्र सध्या आध्यात्मिक माणसेही साक्षीभाव अनुभवत नाहीत. बुद्धाची विपश्यना, जैनांचे प्रेक्षाध्यान हा साक्षीभावाचाच अनुभव आहे. मुस्लीम धर्मीय रोजा पाळतात त्या वेळी आवंढा गिळत नाहीत, त्याला तकवा म्हणतात. हे शरीराप्रति साक्षीभाव वाढवण्यासाठीच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेंदूविज्ञानातील संशोधनानुसार साक्षीभाव हे मानवी मेंदूचे इनबिल्ट फंक्शन आहे. साक्षीध्यान हे ते सक्रिय करण्यासाठीची प्रक्रिया आहे. त्यामुळे अध्यात्म न मानणाऱ्या माणसांनीदेखील त्यासाठी वेळ द्यायला हवा.

– डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com