इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात (अंदाजे इ.स.पूर्व २६२-१९०) होऊन गेलेला अपोलोनिअस हा पर्गा येथील प्राचीन ग्रीक गणिती भूमितीतज्ज्ञ होता. याची ओळख शालेय पाठय़पुस्तकात त्रिकोणाच्या मध्यगेची (मीडियन) लांबी काढण्याच्या प्रमेयातून होते, जे पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन आहे. मात्र अपोलोनिअसचे उल्लेखनीय कार्य आहे ते शंकूला प्रतलाने वेगवेगळ्या कोनांत छेदले असता जे विविध शांकव (कोनिक सेक्शन्स) मिळतात त्यांचा सखोल अभ्यास! शांकवांवर लिहिलेल्या आठ पुस्तकांमध्ये त्याने शांकवांचे सुमारे ४०० गुणधर्म सिद्ध केले, ज्यांपैकी अनेक महाविद्यालयीन भूमितीत अभ्यासले जातात.

अन्वस्त (पॅरॅबोला), विवृत्त (एलिप्स), अपास्त (हायपरबोला) या प्रसिद्ध शांकवांचा उपयोग स्थापत्यशास्त्र, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, खगोलशास्त्र इत्यादी शाखांमध्ये तसेच कलात्मक रचनांमध्येसुद्धा होतो.  मॅकडोनाल्डच्या लोगोमधल्या ‘एम’ अक्षराच्या मांडणीत तसेच पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या रचनेत अन्वस्ताचा वापर आहे. गाडीचे हेडलाईट्स व स्पॉट्लाईट्स यांच्या रचनेतही अन्वस्त दिसतात. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल—२च्या सुंदर आकर्षक इमारतीमध्ये अपास्तांचे आकार पाहायला मिळतात. वैद्यकशास्त्रातही लिथोट्रिप्सी नावाच्या मूत्रपिंडातील खडे मोडून काढण्याच्या उपकरणात विवृत्ताभ नाभीचा (फोकस ऑफ एलिप्सॉइड) उपयोग आघाततरंग निर्माण करण्यासाठी केलेला असतो.

‘अपोलोनिअसचा प्रसिद्ध प्रश्न’ हा मान मिळालेला प्रश्न म्हणजे ‘दिलेल्या तीन वर्तुळांना स्पर्श करणारे वर्तुळ काढणे’. हा प्रश्न त्याने आपल्या पुस्तकात सोडवून दिला. असे म्हणतात की, अपोलोनिअस केवळ पट्टी व कंपास यांच्या साहाय्याने भौमितिक रचना करीत असे. अपोलोनिअसने चयनशास्त्रातही (कॉम्बिनेटोरिक्स) कार्य केले. त्या शाखेतील एका जालव्यूहाला अपोलोनिअन नेटवर्क हे नाव आहे. खगोलशास्त्रातही अपोलोनिअसचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याने ग्रहांच्या भासमान गतींसंबंधी मांडलेल्या उत्केंद्री आणि अपिचक्रीय प्रणालीचा (सिस्टीम ऑफ एक्सेन्ट्रिक अ‍ॅण्ड एपिसायक्लिक मोशन) उल्लेख टॉलेमी या गणितज्ञानेही केला आहे.

याशिवाय प्रतलीय बिंदुपथ (प्लेन लोकस), अंकगणितीय गणनपद्धती, ग्रहांच्या स्थिती व त्यांचे पश्चगमन (रेट्रोग्रेड मोशन), अन्वस्ताकार आरशाद्वारे प्रकाशाचे केंद्रीभवन अशा अनेक विषयांवर अपोलोनिअसने विस्तृत लेखन केले आहे. वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांच्या गुणोत्तराचे म्हणजेच पायचे जे मूल्य आर्किमिडीजने काढले होते त्यापेक्षा अधिक जवळचे अंदाजी मूल्य त्याने काढले होते. एकूणच प्राचीन ग्रीक गणितज्ञांच्या गौरवशाली परंपरेतील अपोलोनिअसचा गणिताच्या विकासात मोलाचा वाटा आहे. त्याच्या सन्मानार्थ एका चंद्रविवराला त्याचे नाव देण्यात आले आहे.

– शोभना नेने

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org