– डॉ. यश वेलणकर

२००५ मध्ये जगातील मेंदुशास्त्रज्ञांची परिषद होती. तेथे डॉ. रिचर्ड डेव्हिडसन यांनी दलाई लामांना आमंत्रित केले. दलाई लामांनी तेथे ‘मेंदुविज्ञान आणि समाज’ या विषयावर आपले विचार मांडले. तेव्हापासून, ध्यानाचा मेंदूवर होणारा परिणाम तपासण्यासाठी अनेक संशोधक संशोधन करू लागले आहेत. डॉ. डेव्हिडसनदेखील अधिक संशोधन करीत आहेत. ‘एकाग्रता ध्यान’ करणारे जुने साधक आणि नवशिके स्वयंसेवक असे दोन गट त्यांनी केले. एका बिंदूवर त्यांना लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आणि त्यांच्या मेंदूतील वेगवेगळ्या भागांत काय घडते याचा अभ्यास सुरू केला. आपण एखाद्या ठिकाणी दृष्टी केंद्रित करतो तेव्हा मेंदूतील ‘कॉर्टेक्स’मधील दृष्टीशी संबंधित भाग आणि ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’मधील ‘अटेन्शन’शी संबंधित भाग उत्तेजित होतो.

या प्रयोगात असे आढळले की, नवीन व्यक्तींपेक्षा ज्यांनी १९ हजार तास अशा ध्यानाचा अभ्यास केला आहे, त्यांच्या मेंदूतील हा भाग अधिक उत्तेजित होतो. नवख्या मंडळींचे चित्त एकाग्र होणे थोडेसे कठीण असल्याने हा फरक स्वाभाविक म्हणावा लागेल. आश्चर्याची गोष्ट वेगळीच होती. ४४ हजार तास ध्यान केलेल्या साधकांच्या मेंदूतील या भागामधील उत्तेजना १९ हजार तास ध्यान केलेल्या साधकांपेक्षा कमी होती! कोणतेही नवीन कौशल्य- उदाहरणार्थ नवीन भाषा- शिकत असताना मेंदूतील संबंधित भाग कमी सक्रिय असतो. सरावाने ते कौशल्य जमू लागले, की मेंदूत अधिक उत्तेजना दिसू लागते; पण ते कौशल्य सवयीचे झाले, की पुन्हा मेंदूतील उत्तेजना कमी होते. याला उलट ‘व’ आकाराची ‘लर्निग कव्‍‌र्ह’ म्हणतात.

एकाग्रता ध्यानाचाही असाच ‘कव्‍‌र्ह’ येत असल्याने, तेही एक कौशल्य आहे. ते सवयीचे झाले की, एकाग्र होण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागत नाहीत; मन सहजतेने एकाग्र होते हे सिद्ध झाले. रोज पाच तास ध्यान केले तर दहा वर्षांत सुमारे १९ हजार तास सराव होऊ शकतो. आजच्या काळातील संसारी माणसाला एवढा सराव शक्य नाही. पण रोज थोडा वेळ बसून ध्यान आणि नंतर अधिकाधिक वेळ वर्तमान क्षणात लक्ष आणण्याचा प्रयत्न केल्याने काय होते, याचे संशोधन नंतर झाले. त्यामध्येही माणसाची सजगता अशा सरावाने वाढते असे दिसून आले.

yashwel@gmail.com