डॉ. श्रुती पानसे

लहानपणापासून मेंदूतली विश्लेषणाची केंद्रं चालू असतात. आपण अंदाज करतो. विचार करतो. आपली विचारप्रक्रिया, विश्लेषणप्रक्रिया कशी चालते, याचा  शोध मेंदूशास्त्रज्ञ घेत आहेत. मोठी माणसंच नाही, तर लहान मुलंदेखील प्रत्येक वस्तूचं, व्यक्तीचं विश्लेषण आपापल्या अनुभवाआधारे करत असतात.  आपण नेहमीच समोर घडलेल्या/ घडणाऱ्या घटनेचा, ऐकू येणाऱ्या शब्दांचा अर्थ लावत असतो. कुतूहल आणि विश्लेषण हे सूत्र यामागे आहे. दोन माणसं बोलत असतात, तेव्हा तिसरा माणूस त्यांचं ऐकून विश्लेषण करून आपलं मत मांडत असतो. कोणत्याही प्रकारचं विश्लेशण करण्यासाठी मेंदूला थोडा अवधी द्यावा लागतो. हा अवधी दिला तर कदाचित ते मत योग्य असण्याची शक्यता असते. जेव्हा समोर कोणत्याही विषयावर एखादा विवाद चाललेला असतो, तेव्हा  कोणीतरी एक माणूस ‘अ’च्या बाजूने बोलतो/ आपलं मत मांडतो, त्याच वेळी दुसरा माणूस ‘ब’च्या बाजूने बोलतो. या वादविवादांमुळेच ऐकणाऱ्यांना किंवा वाचणाऱ्यांना दोन्ही बाजू समजायला मदत होते आणि स्वत:साठी काही एक निर्णय घेणं सोपं जातं, पण फारच कमी वेळा असं घडतं.

विशेषत: समाजमाध्यमांवर. बहुतेकदा लोक कोणती तरी एक बाजू वाचतात. ती खरी वाटायला लागते. आपल्याला ज्यात रस आहे किंवा आपण ज्या बाजूचे आहोत, ते विषय मीडियावर सतत दिसत राहतात. यामुळे दुसऱ्या बाजूचा विचार फारसा होत नाही.  कारण ‘लाइक’ ठोकताना विश्लेषणक्षमता वापरली जातेच असं नाही.

एखादी गोष्ट सविस्तर समजून घेणं हे वेगळं आणि एखादा विचार एका वाक्यात वाचणं हे वेगळं. दोन मिनिटांच्या खऱ्या किंवा बनावट व्हिडीओतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मत बनवणं हे फारच वेगळं. असं केल्यामुळे आपण इतरांच्या विचारांचे गुलाम होतो. जशा जाहिराती पुन्हा पुन्हा दाखवल्यानंतर त्यावर विश्वास बसायला लागतो. तशाच खोटय़ा, बनावट, भडक, एकांगी, विषारी बातम्या बघितल्यावर होतं. माणसाची विश्लेषणाची शक्ती कमी व्हायला लागते.

एखादी कलाकृती आवडली म्हणून दाद देणं वेगळं. पण त्या कलाकृतीचं परीक्षण करायचं असेल तर, मेंदूला स्वत:ची निसर्गदत्त क्षमता वापरायला द्यायची असेल तर, विश्लेषण करण्यासाठी थोडा अवधी द्यायला पाहिजे.

contact@shrutipanse.com