आपल्याकडे सामान्यत: घरातील ‘सर्वच कचरा’ एकत्र करून बाहेर टाकण्याची पद्धत रूढ झाली आहे. शहरात अशा रीतीने दररोज निर्माण होणाऱ्या हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणेतून हा कचरा एकत्र गोळा करून शहर-गावाबाहेर मोकळ्या जागेवर किंवा कचराभूमीवर टाकून देण्यात येतो. या टनावारी कचऱ्याच्या ढिगात गेल्या काही दशकांमध्ये भर पडते आहे ती बिघडलेल्या अथवा वापरून खराब झालेल्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची. कचऱ्यातील या उपकरणांच्या मदर बोर्ड्स, प्रिंटेड सर्किट बोर्ड्स किंवा मायक्रोचिप्स यांसारख्या अंतर्गत प्रणालींमध्ये पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला अत्यंत हानिकारक असे आर्सेनिक, लिथियम, अँटिमनी, शिसे, पारा, कॅडमियम, निकेल यांसारखे ‘जड धातू’ असतात. तसेच पॉलिक्लोरिनेटेड बायफिनाइल्स (पीसीबी), पॉलिब्रोमिनेटेड बायफिनाइल्स (पीबीबी), क्लोरोफ्ल्युरोकार्बन (सीएफसी) असे बहुतांश आम्लधर्मी रासायनिक पदार्थही असतात. याव्यतिरिक्त सोने, चांदी, तांबे, अ‍ॅल्युमिनियम यांसारखे मौल्यवान धातूदेखील याअंतर्गत प्रणालींमध्ये वापरलेले असतात. असे संमिश्र घटक असलेली ई-उपकरणे घरातील इतर कचऱ्यात मिसळली जाऊन उघडय़ावर, कचराभूमीवर जाऊन पडतात.

कालांतराने या कचऱ्याच्या ढिगात विविध प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया होऊ लागतात. यातून निर्माण होणारी अंतर्गत उष्णता आणि सूर्यप्रकाशाची उष्णता यामुळे या कचऱ्याच्या ढिगात असलेल्या ई-उपकरणांमधील वर उल्लेख केलेल्या विविध हानिकारक घटकांचे अपघटन होऊ लागते. हे घटक वायुरूपात हवेत मिसळून हवा प्रदूषित करतात. त्याचप्रमाणे द्रवरूपात जमिनीतून खाली झिरपून जमीन आणि भूगर्भातील जलसाठे मोठय़ा प्रमाणात प्रदूषित करतात. काळाच्या ओघात ही घटक रसायने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे नैसर्गिक परिसंस्थेत येतात आणि शेवटी मानवी शरीरात प्रवेश करतात. हे विषारी घटक मानवी शरीरात मेंदू आणि मज्जासंस्था, पुनरुत्पादन संस्था, मूत्रपिंड आणि उत्सर्जन संस्था, यकृत, फुप्फुसे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांसाठी अत्यंत हानिकारक आहेत.

हा ई-कचरा इतका हानिकारक आहे, तरीही तो निर्माण होण्याचे प्रमाण मात्र रोखता येण्याबाहेर वाढलेले आहे. तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल आणि त्या अनुषंगाने रोज नवीन व सुधारित उपकरणे बाजारात येणे, उत्पादकांच्या आकर्षक जाहिराती, लोकांची खरेदी करण्याची वाढलेली क्षमता, जुने उत्पादन वा त्याचे सुटे भाग बाजारातून नाहीसे होणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती कमी होणे या सर्व कारणांमुळे वापरात असलेली उपकरणे टाकून नवीन घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org