डॉ. यश वेलणकर

मानसोपचारात ‘कॅथार्सिस’ (भावनांचे विरेचन) नावाचा प्रकार काही जण वापरतात. हा शब्द सर्वात प्रथम साधारण २,३०० वर्षांपूर्वी अ‍ॅरिस्टॉटल यांनी- माणसे शोकांतिका पाहायला का जातात, या प्रश्नाचे उत्तर देताना वापरला होता. त्याचा मूळ अर्थ ‘वमन’ म्हणजे उलटी किंवा जुलाब करून शरीरातील दोष स्वच्छ करणे असा आहे. शोकांतिका पाहताना माणसे रडतात, त्यामुळे त्यांच्या साठलेल्या भावना बाहेर पडून जातात; याने त्यांना बरे वाटते, असे अ‍ॅरिस्टॉटल यांना वाटत होते.

नंतर या शब्दाचा उपयोग सिग्मंड फ्रॉइड यांनी केला. ‘हिस्टेरिया’च्या रुग्णांत भावना दडपलेल्या असतात. त्यांना त्या व्यक्त करायला संधी दिली की त्यांचा त्रास कमी होतो, असे फ्रॉइड यांचे मत होते. त्यानंतर हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जाऊ लागला. भारतात शिमग्यात शिव्या देण्याचा किंवा बोंब मारण्याचा प्रकार हा ‘कॅथार्सिस’च आहे असे म्हणतात. ओशो रजनीश यांनी ‘डायनॅमिक मेडिटेशन’ हे नवीन प्रकारचे ध्यान शिकवायला सुरुवात केली. त्यामध्ये ध्यानासाठी शांत बसण्यापूर्वी ‘हुं’ असा आवाज काढत उडय़ा मारायच्या; नंतर काही वेळा मुद्दाम रडायचे, हसायचे असा प्रकार आहे. या प्रकाराने ‘कॅथार्सिस’ म्हणजे भावनांचे विरेचन होते असे सांगितले जाते.

मानसोपचारातही रुग्णाला असे करायला लावणे वा राग व्यक्त करण्यासाठी पिशवीवर ठोसे मारायला लावणे हे केले जाते. प्रेशर कुकरमध्ये वाफ साठून राहिली आणि तिला बाहेर पडायला जागा मिळाली नाही तर स्फोट होतो. माणसाच्या मनातदेखील भावनांची ऊर्जा कोंडली गेली तर त्रास होतो. या कोंडलेल्या ऊर्जेला व्यक्त होण्यासाठी भावनिक विरेचन उपयोगी पडते, असा सिद्धांत मांडला जातो.

या तंत्राचा किती उपयोग होतो, यावर संशोधन झाले आहे. त्यात हे लक्षात आले की, तीव्र भावना मनात असतात तेव्हा वेगाने विचार येत राहतात. अशा वेळी शारीरिक हालचाली वेगाने केल्या, उडय़ा मारल्या, नाचले की शरीरमनात तयार झालेली ऊर्जा वापरली जाते आणि शरीर थकते. त्यानंतर शांत बसून ध्यानाचा सराव करणे सोपे जाते. मात्र, ध्यानाचा सराव न करता केवळ भावनिक विरेचन केले, राग व्यक्त करण्यासाठी गुद्दे मारायला लावले, तर मनातील राग कमी न होता वाढतो असे दिसते. भावनांचे विरेचन हे ध्यानापूर्वीचे पूर्वकर्म असू शकते, पण केवळ तेच कर्म हा पूर्ण उपचार नाही.

yashwel@gmail.com