पेनिसिलिन या ऐतिहासिक प्रतिजैविकाचे (अँटिबायोटिक) मूळ एका बुरशीत आहे. बुरशीसुद्धा रोगावर उपचार ठरू शकते, हे स्कॉटिश वैद्यकतज्ज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग याच्या या शोधामुळे दिसून आले. उन्हाळी सुट्टी संपवून फ्लेमिंग लंडनमधील रुग्णालयात रुजू झाला होता. प्रयोगशाळेतला अगोदरचा पसारा आवरताना, एका बशीतील स्टॅफिलोकोकस ऑरियस या संसर्गकारक जीवाणूंच्या समूहांबरोबर आणखी एका बुरशीची वाढ होत असल्याचे त्याला दिसले. मुख्य म्हणजे या बुरशीने आजूबाजूच्या स्टॅफिलोकोकस ऑरियसच्या समूहांची वाढ रोखून धरली होती. ही बुरशी म्हणजे ‘पेनिसिलीयम नोटाटम’या बुरशीचाच एक प्रकार असल्याचे सूक्ष्मदर्शकाद्वारे केलेल्या निरीक्षणांतून त्याच्या लक्षात आले. ही बुरशी जीवाणूंना मारक ठरणारे एखादे घटकद्रव्य निर्माण करत होती. अधिक संशोधनानंतर फ्लेमिंगला हे द्रव्य स्ट्रेप्टोकोकस, मेनिंगोकोकस अशा विविध रोगकारक जंतूना मारक ठरत असल्याचे दिसून आले. फ्लेमिंगने आपले हे संशोधन १९२९ साली ‘ब्रिटिश जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल पॅथॉलॉजी’ या शोधपत्रिकेत प्रकाशित केले. सन १९३८मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैद्यकतज्ज्ञ हॉवर्ड फ्लोरी याच्या वाचनात फ्लेमिंगचा हा शोधनिबंध आला.

फ्लोरीने या ‘पेनिसिलिन’वर संशोधन करायचे ठरवले. फ्लोरीने एर्नस्ट चाइन या आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने या बुरशीचा अर्क काढून तो, स्टॅफिलोकोकस ऑरियस या घातक जीवाणूची मुद्दाम लागण केलेल्या काही उंदरांना टोचला. यातील पेनिसिलिन टोचलेले सर्व उंदीर जिवंत राहिले, तर पेनिसिलिन न टोचलेल्या उंदरांपैकी निम्मे उंदीर मेले. पेनिसिलिनवरील तपशीलवार संशोधनानंतर, १९४२ साली अमेरिकेतील कनेक्टिकट येथील अ‍ॅने मिलर या, गर्भपातानंतर संसर्ग झालेल्या महिलेला, पेनिसिलिनच्या उपचारांद्वारे पूर्ण बरे करण्यात या वैद्यकतज्ज्ञांना यश आले. पेनिसिलियम नोटाटमपासून होणारी पेनिसिलिनची निर्मिती अत्यल्प होती. एका मात्रेइतके पेनिसिलिन निर्माण करण्यासाठी दोन हजार लिटर बुरशी तयार करावी लागायची. मात्र कालांतराने याच बुरशीच्या ‘पेनिसिलियम क्रायसोजिनम’ या भावंडाचा शोध लागला व पेनिसिलिनच्या निर्मितीचा वेग हजार पटींनी वाढला. पहिल्या महायुद्धाच्या काळात जीवाणूजन्य न्यूमोनियाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १८ टक्के होती. परंतु दुसऱ्या महायुद्धात पेनिसिलीन उपलब्ध झाल्यामुळे मृत्यूचा हा दर अवघ्या एक टक्क्यावर आला. पेनिसिलिनवरील या उपयुक्त संशोधनासाठी फ्लेमिंग, फ्लोरी आणि चेन यांना १९४५ सालच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org