वयाच्या विशीत इंग्रजी साहित्यात पदवी घेतलेल्या आणि स्त्रीवादी विचारांनी प्रभावित झालेल्या गरिमा पुनियाला ‘लिंगभाव आणि तत्त्वज्ञान’ हा धागा पकडून पीएच.डी. करायची होती. त्या दृष्टीने २०१७ साली शिक्षणाचा आवश्यक टप्पा पूर्ण केल्यानंतर गरिमाला ब्रिटनमधल्या नामांकित विद्यापीठात शिकण्याची संधीही चालून आली. तिकडे उच्च शिक्षणाकरिता जाण्यापूर्वी आई-वडिलांबरोबर सुट्टी साजरी करण्यासाठी आणि ‘स्कुबा डायव्हिंग’चे प्रशिक्षण घेण्यासाठी ती अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील नील बेटावर गेली होती. मात्र तिथे समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, डिशेस्, मासेमारीची तुटलेली जाळी आणि इतर कचरा पसरलेला पाहून ती अस्वस्थ झाली. त्या बेटावर अत्याधुनिक सुखसुविधांनी सज्ज असलेली रिसॉर्ट्स आहेत, पण कचरा-संकलनाची कुठलीच व्यवस्था नसल्याचे तिच्या लक्षात आले. संपूर्ण बेटावरचा कचरा गावातच कुठे तरी जाळला जात असे अथवा बेटावर असलेल्या एकमेव डम्पिंग खड्डय़ात पुरला जाई. ही सगळी परिस्थिती पाहून गरिमाने या बेटावरच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

याआधी काही संस्थांबरोबर कचरा-संकलन आणि व्यवस्थापनाच्या मोहिमांमध्ये सहभागी झाल्याचा अनुभव तिच्या गाठीशी होता. या अनुभवाच्या जोरावर गरिमाने बेटावरील स्थानिक गावकरी, रिसॉर्ट मालक आणि सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले. घरोघरी ओला कचरा, सुका कचरा, पेपर, प्लास्टिक, काचा असे वर्गीकरण सुरू झाले. या कामात तिने शालेय विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले. बघता बघता संपूर्ण बेटावरचा तब्बल २५० टन कचरा संकलित झाला. या कचऱ्यावर पुनप्र्रक्रिया करणारी कोणतीही यंत्रणा बेटावर नसल्याने तो कचरा फेरीबोटीतून पोर्ट ब्लेअरला नेला. तिथे या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. गरिमाच्या या पहिल्याच मोहिमेने बेटावर जनजागृती निर्माण केली. थोडय़ाच अवधीत या मोहिमेचे चळवळीत रूपांतर झाले. त्यातूनच ‘कचरेवाले प्रोजेक्ट’ या संस्थेचा जन्म झाला.

या कामातील पुढचा टप्पा तिथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये कचरा निर्मूलनाबद्दल जागृती निर्माण करण्याचा होता. ते सगळ्यात अवघड काम होते. कारण पर्यटकांना पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेविषयी फारसे देणेघेणे नसते. या वृत्तीमुळेच खाण्या-पिण्याचे पॅकेट्स, बाटल्या कुठेही फेकून दिल्या जातात. ‘कचरेवाले’च्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन गरिमाने नील बेटावर उतरणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात स्वच्छतेचे बीज रुजवले आहे. नील बेटाच्या स्वच्छता मोहिमेनंतर आता गरिमा आणि तिचे ‘कचरेवाले’ हॅवलॉक बेटावर स्वच्छता मोहीम राबवण्यास निघाले आहेत. गरिमासारख्या आणखी तरुणी-तरुण गावागावांतून पुढे आल्यास स्वच्छतेचे मूल्य पाळले जाईलच, पण पर्यावरणाचेही संवर्धन होईल.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org