– डॉ. यश वेलणकर

ध्यानामुळे आकलनशक्ती आणि भावनिक बुद्धी विकसित होते, हे संशोधनात सिद्ध झाल्याने जगभरात ध्यानाचा समावेश शाळा-महाविद्यालयांतील उपक्रमांत केला जाऊ लागला आहे. ‘माइण्डफूल स्कूल्स’ ही चळवळ युरोप-अमेरिकेत सुरू आहे. याच नावाच्या संकेतस्थळावर त्याविषयीचे काम आणि संशोधन पाहता येते. अमेरिकेतील ‘न्यू हेवन कनेक्टिकट’ या शाळेत आठवडय़ातून तीन वेळा ध्यान घेतले जाते. यानंतर मुलांच्या शरीरातील ‘कॉर्टिसॉल’ हे युद्धस्थितीतील रसायन कमी होते, हे स्पष्ट झाले. सॅनफ्रान्सिस्को येथील ज्या शाळांत ध्यान घेतले जाते, तेथील मुले जेथे ध्यान घेतले जात नाही त्या शाळांतल्या मुलांपेक्षा ‘कॅलिफोर्निया अचिव्हमेंट टेस्ट’ या गणितीय व भाषिक आकलनाच्या चाचणीत अधिक यश मिळवतात. तेथील शिक्षकही मानसिक तणावाचे व्यवस्थापन अधिक चांगले करू लागतात, त्यांचा शिकवण्याचा उत्साह वाढतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेतील ध्यानाचा प्रसार श्रीमंत गौरवंशीय समाजातच होता. आता मात्र सरकारी शाळांतील अनेक आफ्रिकी-अमेरिकी गरीब मुले ध्यानाकडे वळू लागली आहेत.

ध्यानाच्या नियमित अभ्यासाने ज्ञानग्रहण, आत्मभान आणि समानुभूती अशी शिक्षणाची तीन ध्येये अधिक सक्षमतेने साध्य होतात, हे आधुनिक संशोधनातून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच पाश्चात्त्य शिक्षणतज्ज्ञ- ध्यानाचा समावेश उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करावा, असे प्रतिपादन करीत आहेत. भारतात मात्र ध्यान अजूनही ‘धार्मिक’ समजले जात असल्याने, महाविद्यालयांतील वातावरणात त्याला फारसे स्थान मिळालेले नाही. पण विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, तसेच त्यांच्यावरील ताण कमी करून शिक्षण खऱ्या अर्थाने आनंददायी करायचे असेल तर ध्यानाविषयीचे गैरसमज आणि पूर्वग्रह दूर करून त्याचा अभ्यास शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरू करायला हवा.

त्यासाठी ध्यानाला पंथ आणि संप्रदायांच्या जोखडातून मुक्त करून मनाच्या विकासाचे ते एक साधन आहे हे मान्य करायला हवे. शारीरिक व्यायामाप्रमाणेच ध्यान हा मेंदूचा व्यायाम आहे. तो केल्याने ते शाळेतल्या परीक्षांना आत्मविश्वासाने तोंड देतीलच, पण पुढील आयुष्यातील परीक्षांमध्येही यशस्वी होतील. तरुण मुलांत निसर्गत: अधिक असणारे सैराट वागणे कमी करण्यासाठीही ध्यानाचा सराव उपयोगी आहे, हे संशोधनात दिसत आहे.

yashwel@gmail.com