– डॉ. यश वेलणकर

मानसिक आजारांपेक्षा व्यक्तिमत्त्वातील विकृती वेगळ्या मानल्या जातात. कारण आजारांची तीव्रता कमी-जास्त होते; त्यांची लक्षणे काही वेळा दिसतात, कधी दिसत नाहीत. असे व्यक्तिमत्त्व-विकृतीत होत नाही. या माणसांचा एक साचा ठरलेला असतो. त्याची लक्षणे पौगंडावस्थेत दिसू लागतात आणि योग्य उपचार केले नाही तर ती आयुष्यभर कायम राहतात. आनुवंशिकता, लहानपणी झालेले मानसिक आघात आणि मिळालेले वातावरण यामुळे अशा विकृती निर्माण होतात. एखाद्या माणसाचा तो स्वभावच आहे असे म्हटले जाते, तेव्हा ती व्यक्तिमत्त्व-विकृती असू शकते.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

अशा विकृतींचे तीन लक्षणसमूहांत (क्लस्टर) वर्गीकरण केले जाते. यातील पहिल्या समूहातील व्यक्तींचे अन्य कुणाशी जवळकीचे नाते नसते. एकलकोंडी, सतत रुसलेली आणि संशयी माणसे आपल्या आजूबाजूला अनेक असतात. हे विकृत व्यक्तिमत्त्वाचे पहिल्या समूहातील प्रकार आहेत.

दुसरा समूह भावनिक विकृतींचा असतो. त्यातील बॉर्डरलाइन व्यक्तिमत्त्व-विकृती असलेल्या व्यक्तींच्या भावना वेगाने बदलत असतात. एखाद्या व्यक्तीविषयी एकाच वेळी प्रेम आणि द्वेष मनात असल्याने हे व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीशी नेहमी भांडत राहते; पण त्या व्यक्तीवर ती खूप अवलंबूनदेखील असते, ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल अशीही भीती ही विकृती असलेल्या व्यक्तीच्या मनात असते. दुसरी व्यक्ती सोडून जाऊ लागली तर ही व्यक्ती तसे करू देत नाही. भावनांचा असा गोंधळ असल्याने त्यांचे स्वत:शीदेखील असणारे नाते निरोगी नसते. त्यामुळे असे व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते. याच दुसऱ्या समूहात सतत स्वत:च्याच प्रेमात असलेल्या, अन्य सर्व माणसांना स्वत:साठी वापरून घेणाऱ्या आणि इतर सर्वानी सतत यांच्याकडेच लक्ष द्यावे अशी इच्छा असणाऱ्या व्यक्तींचाही समावेश होतो. गंमत म्हणून दुसऱ्यांना त्रास देण्याची वृत्ती असणे हीदेखील याच समूहामधील विकृती आहे.

तर तिसऱ्या समूहातील व्यक्ती खूप न्यूनगंड असल्याने एकटय़ाने काहीच न करू शकणाऱ्या, मंत्रचळपणाने तीच ती कृती करणाऱ्या, पण कोणत्याही क्षणाचा आनंद घेऊ शकत नाहीत अशा असतात. याच समूहात स्वत:ला अकारण त्रास करून घेणाऱ्या माणसांचाही समावेश करता येतो. एकाच समूहामधील दोन किंवा अधिक विकृती असतील, तर उपचार करणे सोपे असते. काही माणसांत दोन वेगवेगळ्या समूहांमधील विकृती असतील, तर गुंतागुंत वाढते.

yashwel@gmail.com