– डॉ. यश वेलणकर

काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर यांना षड्विकार म्हटले जाते. हे विकार विघातक भावनाच आहेत. त्या मनात असतात त्या वेळी आनंद नसतो. आरोग्यरक्षणासाठी या वेगांचे धारण करावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. ‘धारण करायचे’ म्हणजे त्यांच्यामुळे शरीरात जे काही होते ते जाणायचे, त्याचा साक्षीभावाने स्वीकार करायचा, पण त्यानुसार लगेच कृती करायची नाही. काम म्हणजे कोणतीही तीव्र इच्छा, आसक्ती; ती असते त्या वेळी मन थाऱ्यावर राहात नाही. त्यामुळे शरीरात बदल होतात आणि संवेदना निर्माण होतात. कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही की क्रोध येतो. याउलट ती इच्छा पूर्ण झाली तर हे सुख कायम राहावे असा लोभ निर्माण होतो. स्वत:च्या कामना पूर्ण होत आहेत असे जाणवू लागले की आपण सर्वशक्तिमान आहोत असे वाटू लागते; या गर्वालाच मद, मस्ती म्हणतात. जे सतत बदलणारे आहे ते नित्य आहे आणि सारे सुख शरीराच्या उपभोगात आहे ही भावना म्हणजे मोह. हे उपभोग, सुख, कीर्ती आपल्यापेक्षा ज्यांना अधिक मिळत आहेत त्यांच्याविषयी कटुता म्हणजे मत्सर होय.

हे षड्विकार मनाला अस्वस्थ करतात, दु:ख निर्माण करतात. त्यामुळे त्यांच्यावर विजय मिळवायला हवा असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. हे विकार शरीर-मनाशी जोडलेले असतात. शारीरिक वेदना, वार्धक्य आणि मनातील चिंता-उदासी यामुळे दु:ख होणे हीच अविद्या होय. ते दु:ख दूर करण्यासाठी ‘मी चैतन्य आहे, साक्षी आहे; केवळ शरीर-मन नाही’ याचे स्मरण ठेवणे, यास आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सेत ‘स्मृतीची स्थापना’ असे म्हटले आहे. सतत साक्षी राहणे म्हणजेच अध्यात्म साधना. त्यामुळे षड्विकार लय पावतात आणि कैवल्य, निर्वाण साधते.

मात्र, हा साक्षीभाव सामान्य संसारी माणसाला शक्य नाही, तो साधुसंतच अनुभवतात असे वाटत राहिल्याने ‘देहबुद्धी त्यागा’ हा उपदेश पोथी-प्रवचनात राहिला. मेंदुविज्ञानाच्या प्रगतीनंतर साक्षीभाव हे मानवी मेंदूचेच एक कार्य आहे आणि तो संसारी माणसांनादेखील रोज थोडय़ा वेळासाठी का होईना पण अनुभवता येतो, हे स्पष्ट झाले आहे. विकाररूपी अंधकार ‘मी म्हणजे केवळ शरीर’ या अज्ञानामुळे निर्माण होतो; साक्षीभावरूपी अंतरीच्या दिव्याने तो दूर करणे हीच खरी दीपावली!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

yashwel@gmail.com