सुनीत पोतनीस

घानाच्या इतिहासात, १९८० पर्यंत झालेल्या सततच्या सत्ताबदलामुळे राजकीय अस्थिरता आली आणि देशाची अर्थव्यवस्थाही उतरणीला लागली. पुढच्या दोन दशकात राष्ट्राध्यक्ष रॉलिंग्ज यांनी मात्र देशाच्या राज्यघटनेत बदल करून अर्थकारण सुधारले,आणि बहुपक्षीय राजकारणाचा पायंडा पाडला. आफ्रिका खंडात अनेक देशांमध्ये दिसून येणारा राजकीय सत्तासंघर्ष, वांशिक संघर्ष गेल्या दोन दशकात घानामध्ये दिसला नाही.  या काळात घानामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका लोकशाही मार्गाने खुल्या वातावरणात पार पडल्या. अलीकडे, जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत नेना अकुफो अदो हे बहुमताने निर्वाचित झालेले, प्रजासत्ताक घानाचे आठवे राष्ट्राध्यक्ष होत. किरकोळ काही हिंसक घटना सोडल्यास घाना  शांतताप्रिय आणि राजकीयदृष्टय़ा स्थिर असलेल्या आफ्रिकेतील मोजक्या देशांपैकी एक समजला जातो. तसेच घानातले राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचे प्रमाण नगण्य आहे कारण भ्रष्टाचार आणि चोरीसारख्या गुन्ह्य़ांना इथे मृत्युदंडासारखी शिक्षा आहे. गेल्या दोन दशकांपासून घाना किनारपट्टीवरून अमली पदार्थाची चोरटी वाहतूक केली जाते. कोलंबिया आणि दक्षिण अमेरिकेतून अमली पदार्थ इथे  बेकायदेशीर पद्धतीने आणून संपूर्ण युरोपात  वितरीत केले जातात. घानाचे सरकार ही चोरटी वाहतूक सक्तपणे बंद करायचा प्रयत्न करते आहे.

तीन कोटी लोकसंख्या असलेल्या घानामध्ये प्रमुख धर्म ख्रिस्ती असून   ७१  टक्के ख्रिस्ती धर्मीय आहेत, तर १८ टक्के इस्लाम धर्मीय आहेत. तसेच हिंदू धर्मीयांचीही संख्या वाढते आहे. १९४७ साली फाळणी नंतर अनेक सिंधी कुटुंबे तेथे स्थलांतरित झाली. त्यापैकी स्वामी घानानंद सरस्वती यांनी राजधानी अक्रा येथे पाच मंदिरे उभारली आणि हिंदू धर्माच्या प्रसाराचे कार्य केले. सध्या घानात असलेल्या १२५०० हिंदूंपैकी अर्धेअधिक मूळचे आफ्रिकन आहेत.

सोने, पेट्रोलियम, हायड्रोकार्बनसारख्या खनिजांनी समृद्ध घानाची अर्थव्यवस्था कोकोच्या मुबलक पिकांमुळे भक्कम आहे. कोको उत्पादन आणि निर्यातीत घानाचा जगात दुसरा क्रमांक आहे.

लवकरच जगातील प्रगत राष्ट्रांच्या यादीत घाना समाविष्ट होईल, असा अर्थतज्ज्ञांचा होरा आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com