घरांच्या किंवा इमारतींच्या छतावरील पावसाच्या पाण्याची शेती किंवा गच्चीवरील पावसाच्या पाण्याची शेती (रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग) ही संकल्पना शहरे/ महानगरांतील वस्त्या तसेच अनेक इमारतींच्या सोसायटय़ांमध्ये मूलभूत आवश्यकता म्हणून रुजायला हवी. या पद्धतीत सपाट अथवा उतरत्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे गोळा करून त्याचा प्रवाह मोठय़ा नळीद्वारे जमिनीवर उतरवला जातो. मग हे पाणी जमिनीत थेट मुरवून जमिनीतील पाण्याच्या साठय़ात भर टाकली जाते- म्हणजेच जमिनीच्या अंतर्गत जलपुनर्भरण केले जाते किंवा हे पाणी थेट जमिनीत न सोडता या पाण्याची साठवणूक केली जाते. या ‘रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे औपचारिक शिक्षण कोणत्याही अभ्यासक्रमात नसल्याने सर्वसाधारणपणे स्थापत्य अभियंते, प्लंबर्स, स्थापत्यविशारद अशा मंडळींच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाने आणि मदतीने आपण अशा प्रकारे पावसाचे पाणी साठवू शकतो. पाणीटंचाईच्या काळात या साठवलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.

छतावरील पावसाच्या पाण्याचा अशा रीतीने संकलनासाठी त्या इमारतीच्या परिसराचा अभ्यास करून प्रकल्पाची आखणी करण्यात येते. यासाठी सर्वप्रथम गच्ची अथवा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजले जाते. हे क्षेत्रफळ आणि त्यावर सरासरी किती पाऊस पडतो, याचे प्रमाण ठरवण्यात येते. ज्या इमारतीसाठी हा प्रकल्प करायचा आहे, त्या इमारतीच्या गच्चीवर पडणाऱ्या पावसाचे पाणी खाली जमिनीपर्यंत वाहून नेणाऱ्या नळांची संख्या आणि हे नळ त्यामधून वेगाने वाहणाऱ्या वजनदार पाण्याचा भार सहन करण्याइतके मजबूत आहेत का, याची खात्री केली जाते. यानंतर अशा रीतीने वाहून आणलेले पाणी लगेच उपयोगात आणण्यासाठी साठवायचे आहे, की विहीर अथवा कूपनलिका यांसारख्या जलस्रोतात पुनर्भरण करण्यासाठी सोडायचे आहे किंवा जमिनीत शोषखड्डा करून ते पाणी साठवायचे आहे, यावर प्रकल्पाची पुढील आखणी करण्यात येते. शोषखड्डे करायचे असल्यास इमारतीच्या लगतच्या परिसरात जलवाहिन्या आणि सांडपाण्याच्या वाहिन्या, नद्या अथवा नाल्यांचे प्रवाह, सेप्टिक टँक्स अथवा वीजवाहिन्या असतील तर या सगळ्यांपासून सुरक्षित अंतरावर शोषखड्डे केले पाहिजेत. छतावरील पावसाच्या पाण्याबरोबर ते वाहून नेणाऱ्या नळामध्ये कचरा शिरू नये म्हणून या नळाच्या दोन्ही टोकांना जाळी, उत्तम दर्जेदार प्रतीच्या प्लास्टिकचे नळ, या नळांची जोडणी अत्यंत काटेकोरपणे करण्यासाठी उत्तम प्रतीचे अ‍ॅडेझिव्ह, पाणी जमिनीजवळ पोहोचल्यावर सुरुवातीचा प्रवाह विसर्जन करणारी यंत्रणा, इत्यादी घटक गच्चीवरील पाण्याचे जलसंकलन करताना ध्यानात घ्यावे लागतात.

विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org