कणांची गती लहरींच्या स्वरूपात दर्शवता येणे शक्य असल्याचे १९२३-२४ सालाच्या सुमारास स्पष्ट झाले. ऑस्ट्रियन संशोधक एर्विन श्रोडिंगेर याने १९२६ साली, एखादा कण ठरावीक वेळी, ठरावीक ठिकाणी असतानाची शक्याशक्यता कळू शकणारे सूत्र मांडले. समजा, एखादा कण बंद पेटीत मार्गक्रमण करीत आहे. पेटी बंद असल्याने तो पेटीत नक्की कुठे आहे, ते बाहेरून कळू शकत नाही. हा कण पेटीतील वेगवेगळ्या ठिकाणी सापडण्याची शक्यता वेगवेगळी असते. ही शक्यता श्रोडिंगेरच्या सूत्रावरून काढता येते. याचा दुसरा अर्थ म्हणजे, हा कण एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शक्याशक्यतेनुसार का होईना, परंतु अस्तित्वात असू शकतो. सर्वसाधारण विधान करायचे तर, पुंजवादानुसार एखादा कण हा एकाच वेळी वेगवेगळ्या ‘स्थिती’त अस्तित्वात असू शकतो. आपल्या सूत्राबद्दल स्पष्टीकरण देताना, श्रोडिंगेरने स्वत:च मांजराचे एक काल्पनिक उदाहरण दिले आहे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”

एका मांजराला झाकलेल्या पिंजऱ्यात ठेवले आहे. याच पिंजऱ्यात एक किरणोत्सारी पदार्थही ठेवला आहे. या पदार्थातील अणूंचा हळूहळू ऱ्हास होत असून, या ऱ्हासामुळे एखादा अल्फा किंवा बीटासारखा विद्युतभारित कण उत्सर्जित होतो आहे. पिंजऱ्यात ठेवलेला किरणोत्सार मापक या कणाची नोंद करतो. ही नोंद होताच, मापकाला जोडलेल्या यंत्रणेद्वारे एक हातोडी खाली पडते आणि त्यामुळे पिंजऱ्यात ठेवलेली हायड्रोसायनिक आम्लाची कुपी फुटते. कुपीतील विषारी आम्लामुळे त्या मांजराचा मृत्यू ओढवतो. पिंजरा झाकलेला असल्याने, मांजराला पिंजऱ्यात ठेवल्यानंतर एखाद्या किरणोत्सारी अणूचा ऱ्हास झाला आहे की नाही, हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे पिंजऱ्यातील मांजर जिवंत आहे की मृत आहे, हेही आपल्याला माहिती नाही. तात्पर्य, आपल्या दृष्टीने मांजर एकाच वेळी जिवंत आहे आणि मृतही आहे!

श्रोडिंगेरचे सूत्र हे सूक्ष्म कणांच्या बाबतीत स्वीकारार्ह ठरले आहे. सूक्ष्म कणांशी संलग्न असणाऱ्या लहरी, त्या कणाच्या तुलनेत लक्षवेधी आकाराच्या असतात. या उलट मोठय़ा वस्तूंच्या बाबतीत त्या नगण्य आकाराच्या असल्याने, त्यांचा परिणाम जाणवत नाही. म्हणूनच पुंजवाद हा सूक्ष्म कणांच्या अभ्यासासाठी परिणामकारक ठरतो. व्यापक सापेक्षतावाद हा मात्र मोठय़ा वस्तूंतील गुरुत्वाकर्षणाच्या अभ्यासासाठी परिणामकारक ठरतो. असे असले तरी, सूक्ष्म कणांतील गुरुत्वाकर्षण अभ्यासण्यासाठी संशोधकांचा या दोन्ही संकल्पना एकत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे.

डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org