10 April 2020

News Flash

मनोवेध : स्वयंसूचना

यश येते आहे हे पाहून त्यांनी १९२० मध्ये ‘सेल्फ मास्टरी थ्रू कॉन्शस ऑटोसजेशन’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.

डॉ. यश वेलणकर

संमोहन चिकित्सेच्या मानसोपचार म्हणून असलेल्या मर्यादा सिग्मंड फ्रॉइड यांच्या लक्षात आल्या, तशाच त्या फ्रेंच मानसशास्त्रज्ञ एमिल कूए  यांनाही जाणवल्या. एमिल स्वत: हिप्नोथेरपिस्ट होते. मात्र संमोहित अवस्थेत दिलेल्या सूचना त्या स्थितीतून बाहेर आल्यानंतर उपयोगी ठरत नाहीत आणि कोणतीही व्यक्ती सतत वा दररोज संमोहित अवस्थेत राहू शकत नाही, हे लक्षात आल्याने रोज सराव करण्याचा उपाय म्हणून ते स्वयंसूचना या तंत्राचा प्रयोग करू लागले. त्याला यश येते आहे हे पाहून त्यांनी १९२० मध्ये ‘सेल्फ मास्टरी थ्रू कॉन्शस ऑटोसजेशन’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.

त्यामध्ये ते लिहितात की, स्वतला सूचना आपण नकळतपणे घेत असतो. हे तंत्र बऱ्याचदा लहानपणीच समजलेले असते. मात्र हे दुधारी शस्त्र आहे. ते अजाणता वापरले गेले तर हानीकारक ठरू शकते. त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर ते आजार बरे करू शकते. या तंत्राचा औषधाच्या जोडीने उपयोग केल्यास औषधांचा परिणाम अधिक चांगला होतो हेही त्यांच्या लक्षात आले. यालाच नंतर ‘प्लासेबो इफेक्ट’ म्हटले जाऊ लागले.

ते रुग्णांना रोज अधिकाधिक वेळ एका वाक्याचा मंत्रासारखा जप करायला सांगू लागले. ‘एव्हरी डे इन एव्हरी वे आय अम गेटिंग बेटर अ‍ॅण्ड बेटर’ म्हणजे ‘दिवसेंदिवस मी सर्वार्थाने चांगला होत आहे’ अशा सूचना स्वतला दिल्या तर आजार लवकर बरा होतो.

अशा पद्धतीने सकारात्मक वाक्याचा जप करून तो विचार मनात धरून ठेवण्याच्या पद्धतीला ‘स्वयंसूचना’ असे म्हटले जाते. आजदेखील हे तंत्र वापरले जाते. या तंत्राचा उपयोग अनेक शारीरिक आजारांतदेखील होतो, हे त्यांनी दाखवून दिले. मात्र याच्या मर्यादाही त्यांच्या लक्षात आल्या होत्या. आपले मन विकल्प निर्माण करते आणि असे विकल्प या तंत्राची परिणामकारकता कमी करतात.

याचसारखे तंत्र म्हणजे ‘स्वसंमोहन’ होय. त्यामध्ये सूचनांच्या पूर्वी कल्पनेने एखादे दृश्य पाहायला शिकवले जाते. किंवा एखाद्या शब्दाचा उपयोग ‘ट्रान्स’ अवस्थेत जाण्यासाठी केला जातो आणि नंतर स्वतला सूचना घेतल्या जातात. अर्थात असे ‘ट्रान्स’मध्ये जाणे सर्वाना शक्य होत नाही. त्यामुळे ते स्वसंमोहन न होता स्वयंसूचना तंत्र होते. आयुर्वेदात सत्त्वावजय चिकित्सेमध्ये साक्षीध्यान आणि स्वयंसूचना या दोन्ही तंत्रांचा आवश्यकतेनुसार उपयोग केला जातो.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2020 12:11 am

Web Title: article on self report abn 97
Next Stories
1 कुतूहल : पर्यावरण चळवळीचा पाया
2 मनातील सुगंध
3 फुलपाखरू आणि त्याचे हितशत्रू 
Just Now!
X