डॉ. यश वेलणकर

मानसशास्त्राच्या संशोधनात असे दिसून येत आहे की ओसीडी, फोबिया, चिंतारोग, भावनांची आंदोलने आदी विकार, ज्या प्रसंगांचा त्रास होतो ते टाळण्याच्या प्रयत्नाने वाढतात. त्यामुळे मानसोपचार पद्धतीत अशा प्रसंगाना सामोरे जाणे हा महत्त्वाचा भाग असतो. द्वंद्वात्मक मानसोपचार पद्धतीतही हे तंत्र वापरले जाते. ते विकारांवरच उपयोगी आहे असे नसून सर्व निरोगी व्यक्तींनीही समजून घेऊन कृतीत आणायला हवे. याची पहिली पायरी म्हणजे काय झाले की आपल्याला राग येतो, भीती/ उदासी वाटते याविषयीची सजगता वाढवायची. उदा.- कुणी नकार दिल्यास मी अस्वस्थ होतो किंवा कुणी उगाचच मोठय़ाने हसू लागले की राग येतो. प्रत्येक व्यक्तीच्या अशा अनेक नाजूक जागा असतात. आता असे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करायचा नाही. बऱ्याचदा ते दुसऱ्या व्यक्तीमुळे होत असतील तर आपण टाळूही शकत नाही.हे प्रसंग घडतील त्या वेळी लगेच व्यक्त न होता स्वत:च्या मनातील भावनांना नाव देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आत्ता माझ्या मनात राग, दु:ख, असहायता आहे असे स्वत:शीच बोलायचे. त्याक्षणी शरीरावर लक्ष नेऊन छाती/ पोटात, डोक्यात काही जाणवत असेल तर त्याचा स्वीकार करायचा. त्यानंतर आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या ते ठरवून तेवढेच बोलायचे. भांडण वाढवायचे नाही. भावनांची तीव्रता जास्त असेल तर स्वत:ला त्रास करून न घेता वेगवेगळे उपाय करून ती कमी करता येणे शक्य असते. दीर्घ श्वसन, स्नायू ताणणे, थोडे चालणे अशी एखादी कृती करायची. विचारांच्या प्रवाहातून बाहेर पडण्यासाठी याचा उपयोग होतो. अन्यथा विचारांच्या आवर्तात वाहून जायला होते. प्रतिक्रिया म्हणून येणाऱ्या विचारांचा लोंढा कमी झाला की आपल्या भावनांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला नक्की काय साधायचे आहे याचा विचार करायचा. म्हणजे एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही रिक्षा थांबवीत आहात पण कुणीच रिक्षाचालक तयार होत नाही. यावेळी राग आला तरी ‘रिक्षाचालकांना धडा शिकवणे’ हे आपले उद्दिष्ट आहे की ‘ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचणे’ हे उद्दिष्ट आहे हे ठरवून, त्यानुसार पुढील कृती ठरवायची. हे बुद्धीला माहीत असले तरी प्रत्यक्षात शक्य होण्यासाठी असा प्रसंग नसताना ध्यानाचा सराव उपयुक्त आहे.

yashwel@gmail.com