– डॉ. यश वेलणकर

ध्यान करीत असताना माणसाच्या मेंदूत काय घडते, याचे संशोधन डॉ. रिचर्ड डेव्हिडसन यांनी सुरू केले. १९८४ पासून ते विस्कोन्सिन विद्यापीठात ‘ब्रेन इमेजिंग अ‍ॅण्ड बिहेव्हियर’ या विभागाचे संचालक म्हणून काम करीत आहेत. तेथे त्यांनी चिंता आणि औदासीन्याच्या रुग्णांच्या मेंदूचे ‘इमेजिंग’ केले. औदासीन्य आजार कोणत्या व्यक्तिमत्त्वाच्या माणसांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते, ते त्यांनी मांडले.

माणूस आनंदी असतो तेव्हा त्याच्या मेंदूतील डावा प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स अधिक सक्रिय असतो, असे डॉ. डेव्हिडसन यांना आढळले. या संशोधनाबद्दल दलाई लामा यांना समजल्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये डॉ. डेव्हिडसन यांची भेट घेतली. १९९२ मध्ये दलाई लामांनी डेव्हिडसन यांना भारतातील त्यांच्या निवासस्थानी म्हणजे धरमशाला येथे बोलावले. तेथे त्यांनी आपल्या आठ सहकाऱ्यांची ओळख करून दिली आणि त्यांच्या मेंदूचे संशोधन करण्याची विनंती केली. हे आठही जण अनेक वर्षे ध्यानसाधना करणारे होते. संशोधनासाठी ‘कंट्रोल ग्रुप’ म्हणून डॉक्टरांनी ध्यान माहीत नसलेले दहा स्वयंसेवक निवडले, त्यांना करुणा ध्यान शिकवले. या १८ जणांवर संशोधन सुरू केले.

करुणा ध्यान म्हणजे ‘भवतु सब्ब मंगलम.. सर्वाचे मंगल होवो, कल्याण होवो’ असे भाव मनात ठेवायचे. निरपेक्ष प्रेम आणि करुणा या भावना मनात धारण करायच्या. डॉक्टरांनी या १८ जणांच्या डोक्याला २५६ इलेक्ट्रिकल सेन्सरचे जाळे बसविले आणि त्यांच्या मेंदूत काय घडते ते अभ्यासू लागले. करुणा ध्यान करताना मेंदूतील डावा प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स अधिक सक्रिय असतो असे त्यांना दिसून आले. हे निरीक्षण त्यांच्या पूर्वीच्या संशोधनाशी सुसंगतच होते. ध्यानाच्या नियमित सरावाने मेंदूतील आपपरभाव निर्माण करणारा ठसा फुसला जातो, हे नंतरच्या संशोधनात दिसून आले.

करुणा ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूतील समानुभूतीसाठी आवश्यक असणारा भाग कोणत्याही माणसाला पाहिले तरी सक्रिय होतो. त्यामुळे आपल्यापेक्षा वेगळ्या गटातील माणसांविषयी असणारा द्वेष कमी करण्यासाठी ध्यानाचे प्रशिक्षण शालेय वयापासून दिले पाहिजे, असे डेव्हिडसन यांना वाटते. साक्षीध्यानाने द्वेषाची प्रतिक्रिया कमी होते आणि त्यानंतर करुणा ध्यानाचा परिणाम अधिक चांगला होतो, हेही नंतर स्पष्ट झाले.

yashwel@gmail.com