आपल्या पश्चिम किनाऱ्यावर, विशेषत: मुंबई प्रदेशात आढळणाऱ्या खारफुटीच्या काही प्रजातींची थोडक्यात रंजक माहिती पुढीलप्रमाणे..

‘तिवर’ (अ‍ॅव्हिसीनिया मरिना) : घर बांधण्यासाठी आणि फर्निचर तयार करण्याकरिता याचे लाकूड वापरले जाते. पाने, फळे जनावरांचा चारा होतात. सुगंधी कडू रस गर्भपातासाठी वापरला जातो. सालीचा उपयोग चामडे तयार करण्यासाठी केला जातो.

‘चिपी’ (सोनेरेशिया केसीओलॅरिस) : तिवराप्रमाणे लाकूड व फळा-पानांचा वापर होतोच, शिवाय टॅनिनदेखील मिळते. फळांचा आंबवून केलेला रस रक्तस्राव थांबवण्यासाठी उपयोगी असतो. लाकडाचा उपयोग बोट आणि पाण्यातील मोठे जहाज बनवण्यासाठी, तसेच दरवाजे, छप्पर, फर्निचर, कॅबिनेट आणि संगीताचे यंत्र बनवण्यासाठी होतो. याचीच ‘सोनेरेशिया अपेटाला’ नावाची प्रजाती तिच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. पॅकिंगचे बॉक्स, घरासाठी लागणाऱ्या फळ्या, दरवाजाचे बोर्ड, होडी, जूट मिल रोलर्स अशा अनेकविध वस्तू या लाकडापासून बनवितात. साल आणि फळे टॅनिंगसाठी वापरली जातात.

‘समुद्रशिंगी’ (डॉलिकॅण्ड्रॉन स्पॅथेशिया) : या प्रजातीचा वापर वैद्यकीय उपचारांत (पानांपासून तयार केलेला चहा तोंडाचे विकार बरे करण्यात व पाने आल्यासह मिरगीच्या त्रासावर उपचारक) होतो. इतर देशांत या वनस्पतीच्या लाकडाचा वापर फर्निचर, पादत्राणे, मुखवटे, मासेमारी जाळ्यासाठी ‘फ्लोट’ आदी बनवण्यासाठी केला जातो.

‘मेसवाक’ (सॅल्वाडोरा पर्सिका) : हे नाव दंतमंजनासंदर्भात अनेकांना परिचित असेल. ही बहुगुणी वनस्पती आपल्या खाडीकिनारी आढळते. मानवी अन्न म्हणून पाने, तर वैद्यकीय क्षेत्रात याची पाने, मुळे, खोड, फळे, बिया अत्यंत गुणकारी असल्याचे संदर्भ आहेत.

‘कांदळ’ (ऱ्हायझोफोरा म्युक्रोनाटा) : हा वृक्ष जळाऊ लाकूड व कोळसा बनवण्यासाठी; पाने, कोवळ्या फांद्या, फळे खाद्य म्हणून; फळांचा रस ‘वाइन’ बनविण्यासाठी; टणक लाकूड फर्निचर, माशांचे सापळे, लाकडी अवजारे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. अर्थात, त्यामुळेच कांदळाची मोठय़ा प्रमाणावर कत्तल होऊन सध्या त्यांची संख्या रोडावली आहे. याचीच दुसरी प्रजाती ‘ऱ्हायझोफोरा एपिक्युलाटा’च्या लाकडापासून बनवलेल्या लगद्याचा उपयोग ब्लॉटिंग आणि कोरूगेटिंग कागद बनवण्यासाठी केला जातो. याच्या कडक मुळातील द्रव्य डासांपासून बचावासाठी वापरले जाते. सालीचा उपयोग चामडे तयार करण्यासाठी केला जातो.

आपल्या किनारी दिसणाऱ्या खारफुटीच्या वनस्पतींचे हे काही उपयोग त्यांचे मानवासाठीचे महत्त्व अधोरेखित करतात.

– हेमंत कारखानीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org