News Flash

मेंदूशी मैत्री : कला साकारताना..

माणूस जेव्हा एखादी कला साकारत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूत अनेक गोष्टी घडून येत असतात

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

‘‘चित्रं काढत बसू नकोस; अभ्यास कर..’’ असा धोशा जेव्हा मुलांच्या मागे लावला जातो तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की, चित्रंच काय, पण कोणतीही कला ही मेंदूविकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते.

माणूस जेव्हा एखादी कला साकारत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूत अनेक गोष्टी घडून येत असतात. कारण ही नवनिर्मिती असते. चित्रकला, शिल्पकला, कोलाज, एखादी सुंदर वस्तू तयार करणं यासाठी उच्च प्रतीची बुद्धिमत्ता लागते.

मेंदू संशोधकांच्या प्रयोगांतून असं लक्षात आलेलं आहे की, जेव्हा माणसं एखाद्या कलेत रमून गेलेली असतात, तेव्हा आकलनशक्ती काम करत असते. त्याचप्रमाणे एकाग्रतेची सर्वोच्च पातळी गाठलेली असते. या गोष्टींमुळे मेंदूतलं ‘सेरोटोनिन’ हे रसायन उद्दीपित होत असतं. मेंदूतल्या लहरींवर सकारात्मक परिणाम होत असतो. हातातल्या कारक कौशल्यांनाही उद्दीपन मिळत असतं. त्या माणसाच्या भावना तो करत असलेल्या कृतीवर एकवटलेल्या असतात. माणसाचा दृष्टिकोन बदलायला मदत होते. या साऱ्यामुळे मेंदूला उद्दीपन मिळत असतं. भावनिक आणि मानसिकरीत्या त्यात रमून गेल्यामुळे तो समाजाशी जोडला जातो आणि त्यामुळेच मेंदूचा विकास होतो.

अस्तित्वात नसलेली गोष्ट प्रत्यक्षात येत असते, म्हणजेच ‘सर्जनशील कृती’ घडत असते. या वेळी मेंदूमध्ये जे काही घडत असतं, त्याचा परिणाम शिकण्याच्या क्षमतेवरसुद्धा होत असतो. मेंदूशास्त्रातलं मूलभूत संशोधन आणि कला यांचा धागा जोडून यावर अभ्यास करणारे एरिक जेन्सेन यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाला कला ही प्रोत्साहन देण्याचं काम करते.  एकदा माणसानं कलेचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली, की शिकण्यासाठी त्याची मनोभूमी तयार होत असते.

‘न्यूरो-अ‍ॅस्थेटिक्स’ म्हणजे मेंदू-सौंदर्यशास्त्राचे लंडनस्थित प्राध्यापक सेमीर झेकी यांनी एक प्रयोग केला. त्यात सहभागी झालेल्यांना अतिशय सुंदर चित्रं दाखवली. त्यात काही निसर्गचित्रं, काही स्थिरचित्रं होती. बघणाऱ्याला ज्या चित्रातून अतिशय आनंद होत होता, त्यावेळेला भावनिक मेंदूत उद्दीपन झाल्याचं दिसून आलं; म्हणजेच त्या क्षेत्रातला रक्तप्रवाह वाढलेला दिसून आला.

या सर्व कारणांसाठी शालेय जीवनात विविध कलांचा समावेश हवा, तसेच त्यानंतरही माणसाच्या जीवनात एखादी तरी कला हवी.

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2019 12:05 am

Web Title: article on while practicing art abn 97
Next Stories
1 कुतूहल : श्रोडिंगेरचे मांजर
2 आकलनासाठी रक्तप्रवाह
3 हायझेनबर्गची अनिश्चितता
Just Now!
X