अ‍ॅलन ग्रिफिथ या अत्यंत गरीब ब्रिटिश कुटुंबात जन्मलेल्या मुलाच्या मनोधारणेत निरनिराळ्या घटनांमुळे बदल होऊन पुढे दक्षिण भारतात स्वामी दयानंद या नावाने त्याने आश्रम चालविला हे स्तिमित करणारे आहे! अ‍ॅलन आणि दोन मित्रांनी वर्षभर सामूहिक, आश्रमीय जीवनक्रम व्यतीत केल्यावर अ‍ॅलनच्या मनोधारणेत मोठा बदल झाला. अ‍ॅलननी स्वतला चर्च ऑफ इंग्लंडच्या कार्याला वाहून घेण्याचे ठरवले.

१९३१ मध्ये अ‍ॅलन कॅथलिक बेनेडिक्टीन पंथाच्या मठाधिपतीच्या (अ‍ॅबट) संपर्कात आले आणि मठातच राहू लागले. पुढे रोमन कॅथलिक पंथाच्या विधिवत त्यांना १९४० साली धर्मप्रचारक म्हणून मान्यता मिळून त्यांचे नामकरण ‘बेडे’ असे करण्यात आले. बेडे हे एका ख्रिश्चन संताचे नाव होते. पुढे स्कॉटलंडमधील मठात अ‍ॅलनची ओळख फादर बेनिडिक्ट अलापात या भारतीय वंशाच्या पण इंग्लंडमध्ये जन्मलेल्या धर्मगुरूशी झाली. अ‍ॅलनना त्याच्याकडून भारत आणि पूर्वेकडील देश, योगसाधना, वैदिक धर्म वगरेंबद्दल बरीच माहिती मिळाली. १९५५ साली अ‍ॅलनना दक्षिण भारतात मिशनरी कार्य आणि मठ स्थापनेसाठी पाठविले गेले. केरळमधील कुरीसुमाला येथे आल्यावर त्यांनी काही सहकाऱ्यांसोबत ‘ख्रिस्ती संन्यस्त समाज’ स्थापन करून आश्रम स्थापन केला. या आश्रमात त्यांनी भारतीय परंपरांप्रमाणे स्वत व्रतस्थ जीवनशैली स्वीकारून आपल्या शिष्यांनाही स्वीकारायला लावली. भगवी वस्त्रे वापरणे, मांसाहार वर्ज्य वगैरे बंधने पाळणाऱ्या अ‍ॅलननी दयानंद हे नाव धारण करून संस्कृत, मल्याळम, तामीळ भाषा शिकून हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि साहित्य यांचा सखोल अभ्यास केला. स्वामी दयानंद, तमिळनाडूतील शांतीवन या आश्रमात राहावयास आले. येथे त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन धर्माचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करून यासंबंधात बारा पुस्तके लिहून युरोप-अमेरिकेत अनेक वेळा व्याख्याने दिली.  १९९३ साली  स्वामी दयानंदांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com