श्रुती पानसे contact@shrutipanse.com

बाळ घडत असतं तेव्हापासून बालसंगोपनाला सुरुवात होते. ज्या घरामध्ये आई-बाबा दोघेही नोकरी करतात, त्या घरातही बाळाची बहुतांश काळजी, जबाबदारी ही आईच उचलताना दिसते. वास्तविक, इथं बाबाची भूमिका फार महत्त्वाची असते. बाळ जन्मल्यानंतर त्याच्या जडणघडणीत आई आणि बाबा असा दोघांचाही वाटा असायला हवा असं नेहमी म्हटलं जातं. प्रत्यक्षात तसं घडत मात्र नाही. परंतु आधुनिक घरांमध्ये बाळाचं संगोपन दोघांनी करायचं असंच ठरवायला हवं.

अशीही मांडणी केली जाते की, बाबा पैसे कमावून आणतो, तो दिवसभर घरात नसतो आणि म्हणून मुलांना सगळ्यात जास्त सहवास आईचाच मिळतो. आता काही घरांमध्ये तरी हे चित्र बदललेलं आहे. बाबाप्रमाणे आईसुद्धा दिवसभर नोकरी करते, काम करते; पण तरीसुद्धा असंच चित्र दिसतं की, आईचा सहवास मुलांना जास्त आहे. याचं कारण आपल्या समाजाच्या जडणघडणीत तर आहेच, पण बाबाच्या मानसिकतेतसुद्धा आहे. आपल्या लहानग्या मुलाला किंवा मुलीला वाढवणं, त्याच्या/ तिच्यासाठी काही करणं, यात आपणही काही भूमिका बजावू शकतो याची ओळखसुद्धा कित्येक घरातल्या बाबा मंडळींना झालेली नसते. मुलं सांभाळणं हा जणू काही बायकांचा प्रांत आहे, असं समजून बहुतेकांनी हात झटकलेले असतात.

पण यात त्या बाबाचंच नुकसान जास्त होतं. बाबाला बाळाचा सहवास मिळत नाही. लहानसं बाळ आपापल्या पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करून मेंदूच्या विविध क्षेत्रांमध्ये न्युरॉन्सची जोडणी करत असतं. विविध माणसं, त्यांची भाषा.. अशा अनेक गोष्टींबद्दलच्या अनुभवांचा संचय करण्याचं काम चालू असतं. अशा वेळी विविध कारणांमुळे बाबाचा सहवास मिळाला नाही, तर मेंदूत आवश्यक त्या जोडण्या होत नाहीत.

आपल्याकडे बालसंगोपनात नेहमी आई पुढं असते. बाबा जवळपास नसतोच.  यामुळे बहुतांशी घरांमध्ये आई व मुलं यांचं मेतकूट असतं. आणि बाबा वेगळा असतो. मुलं कोणत्या इयत्तेत आहेत, हेही बाबाला माहीत नाही, याचं कौतुक केलं जातं. मुलांपासून असं अंतर पडतं. पुढे ते वाढतच जातं. तरुण झाल्यावर मुलं एकवेळ आईशी बोलतात, बाबाशी नाही. त्याचं मूळ या दिवसांत झालेल्या न्युरॉन-जोडणीत आहे.