डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

आपल्या एकूण शरीराच्या वजनाच्या तुलनेत मानवी मेंदूचं वजन हे केवळ दोन टक्के आहे. असं असूनही एकूण शरीराला जेवढी ऊर्जा लागते, त्या ऊर्जेच्या २० टक्के ऊर्जा ही केवळ मेंदूला लागत असते. मेंदूला जर एवढी ऊर्जा रोज पुरवली तरच तो सक्षम राहू शकतो. विचार आणि कृती दोन्हीसाठी भरपूर ऊर्जा वापरली जात असते. विचार करत असतानाही विविध रसायनांची कामं चालू असतात, विविध क्षेत्रांतल्या न्यूरॉन्सचं चलनवलन आणि ‘न्यूरोट्रान्स्मीटर्स’मध्ये संदेशवहन चालू असतं.

या साऱ्यासाठी मुख्यत: ऊर्जा मिळते ती आहारातून. पण केवळ चांगला आहार देणं पुरेसं नाही. तो आहार वेळेच्या वेळी, ऋतुमानानुसार, वयानुसार आणि प्रकृतीनुसार घ्यायला हवा. कारण या आहारातून ग्लुकोज मिळत असतं. आहाराला योग्य व्यायामाची जोड द्यायला हवी. कारण योग्य व्यायामातून मेंदूला ऑक्सिजन मिळत असतो.

आपण झोपतो तेव्हाही मेंदू ऑक्सिजन आणि ग्लुकोज वापरत असतो. त्यामुळे आपण झोपतो तेव्हाही मेंदू शांत बसत नाही. त्याला ठरवून दिलेली कामं तो झोपेतदेखील करत असतो. हे काम म्हणजे  दिवसभरात घडलेल्या घटनांवर काम करणं. या घटनांना अल्पकालीन अथवा दीर्घकालीन स्मृतीक्षेत्रांकडे पाठवणं. काही स्मृतींना नष्ट करणं हेदेखील अत्यंत महत्त्वाचं काम मेंदू झोपेच्या काळात करत असतो. मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कृतींसाठीही मेंदू ऊर्जा वापरत असतो.

याशिवाय मेंदूला पाण्याची अत्यंत गरज असते. बठं काम करताना, बोलणं, लिहिणं आकडेमोड करणं किंवा विचार करणं यांसाठीही पाणी, ग्लुकोज आणि ऑक्सिजन वापरला जातो. या गोष्टी कमी पडल्या तर मेंदूवर परिणाम होतो. सुस्ती येते. कधीकधी ही सुस्ती शरीराला जाणवतही नाही, पण मेंदूला मात्र आलेली असते.

विविध पद्धतींचा व्यायाम करणं, चालणं, पळणं, कोणत्याही प्रकारचे नृत्यप्रकार, एरोबिक्स, योगासनं, प्राणायाम यामुळे योग्य पद्धतीनं व योग्य प्रमाणात मेंदूमध्ये ऑक्सिजन घेतला जातो आणि योग्य पद्धतीनं सोडला जातो. प्राणायाम हा मेंदूला आणि शरीराला अतिशय उपकारक आहे. यामुळे निरोगी जगण्याच्या शक्यताही वाढतात.