एखाद्या मूलद्रव्याची किंमत एका ग्रॅमला २७ दशलक्ष डॉलर्स आहे असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल? पण खरोखरच कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत तयार केलेले कॅलिफोर्निअम हे मूलद्रव्य इतके महाग आहे. आणि त्यावर कडी म्हणजे तेवढे पसे मोजायची तयारी असली तरी ते मिळणार नाही, कारण ते तेवढे प्रयोगशाळेत तयार करणे महाकठीण आहे. ग्लेन सीबोर्ग आणि स्टॅन्ली थाँप्सन, केनेथ स्ट्रीट, अल्बर्ट घीओर्सो यांनी  कॅलिफोर्निया येथील विद्यापीठात कॅलिफोर्निअम हे मूलद्रव्य १८५० मध्ये तयार केले. यासाठी लागणारे क्युरिअम जमविण्यासाठी त्यांना तीन वष्रे लागली.

क्युरिअमवर सायक्लोट्रॉनमधून शक्तिशाली अल्फा किरणांचा मारा करून बर्केलिअम तयार होते. या बर्केलिअममधून नंतर बीटा किरणांच्या उत्सर्जनामुळे कॅलिफोर्निअम तयार होते. पुढे न्यूट्रॉन्स प्रग्रहण (न्यूट्रॉन कॅप्चर) करून कॅलिफोर्निअम-२५१ (अर्ध-आयुष्य काल ८९८ वष्रे) व कॅलिफोर्निअम-२५२ (अर्ध-आयुष्य काल २.६४५ वष्रे) बनते. असे हे मूलद्रव्य अमेरिकेत फक्त ओक रीज नॅशनल प्रयोगशाळेत व रशियात रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅटोमिक रिअ‍ॅक्टर्समध्येच तयार केले जाते. २००३ साली अनुक्रमे ०.२५ ग्रॅम व ०.०२५ ग्रॅम इतकेच कॅलिफोर्निअम बनवले गेले. कॅलिफोर्निअम-२५२च्या शक्तिशाली बीटा किरणोत्सारामुळे अणुभट्टी सुरू करण्याकरिता ते फार उपयोगी ठरते आहे. कॅलिफोर्निअमचा एक मायक्रोग्रॅम जवळपास ११७ मिलियन न्यूट्रॉन्स एका मिनिटात सोडतो. त्यामुळे सोने व चांदीच्या तसेच सूक्ष्म मूलद्रव्यांच्या संशोधनात वापरण्यात येणाऱ्या न्यूट्रॉन-सक्रियण विश्लेषण प्रक्रियेत कॅलिफोर्निअम वापरला जातो. तेलांच्या विहिरीत तेल आणि पाण्याचे थर ओळखण्यासाठी तसेच विमानात धातूची क्षीणता तपासण्यासाठी कॅलिफोर्निअमचा वापर करतात.

गर्भाशयाच्या व मेंदूच्या कर्करोगात इतर उपचार काम करेनासे झाल्यास कॅलिफोर्निअमची न्यूट्रॉन्स थेरपी वापरली जाते. अर्थात याचेही दुष्परिणाम आहेतच. कॅलिफोर्निअम हाडांमध्ये साठून लाल रक्तपेशींच्या वाढीला प्रतिबंध करते.

हे मूलद्रव्य, जे स्वत:ही प्रयोगशाळेतच तयार झाले आहे, इतर नव्या मूलद्रव्यांच्या जन्माकरता वापरले जाते. कॅलिफोर्निअम-२५४चा वर्णपट स्फोट होणाऱ्या ताऱ्यामध्ये (सुपरनोवामध्ये) दिसतो. किरणोत्सारामुळे कॅलिफोर्निअमची अगदी एका ग्रॅमची वाहतूकसुद्धा कडेकोट बंदोबस्तात केली जाते.

– डॉ. कविता रेगे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org