News Flash

कुतूहल – विपिंजण यंत्र (कार्डिग यंत्र)

पिंजण विभागात कापसाचे लहान लहान सुटे पुंजके तयार होतात आणि कापसातील ६०% ते ८०% कचरा काढून टाकला गेलेला असतो.

| July 7, 2015 01:04 am

पिंजण विभागात कापसाचे लहान लहान सुटे पुंजके तयार होतात आणि कापसातील ६०% ते ८०% कचरा काढून टाकला गेलेला असतो. कापूस सूत बनविण्याच्या योग्यतेचा करण्यासाठी कापूस संपूर्णपणे मोकळा म्हणजे प्रत्येक तंतू एकमेकांपासून सुटा करणे आणि त्याचबरोबर कापसातील राहिलेला कचरा काढून टाकून कापूस १००% स्वच्छ करणे गरजेचे असते. हे कार्य विपिंजण यंत्रामध्ये केले जाते. विपिंजण यंत्राला पिंजण यंत्रणेकडून कापूस लॅपच्या रूपात किंवा नळ्याच्या साहाय्याने थेट पुरविला जातो.
या यंत्रात कापूस गेल्यानंतर करवती दाते असलेल्या विविध आघातक आणि पट्टय़ा यांच्या प्रक्रियेमुळे कापसाचे तंतू एकमेकांपासून पूर्णपणे सुटे केले जातात आणि कापसातील संपूर्ण कचरा काढून टाकला जातो. वििपजण यंत्रात कचऱ्याबरोबर काही आखूड तंतू आणि कापसातील गाठीदेखील काढून टाकल्या जातात. त्यामुळे सुताचा दर्जा उंचावण्यात मदत होते.
विपिंजण यंत्रातून शेवटी कापसाचा पेळू तयार केला जातो व तो एका पिंपामध्ये साठविला जातो. या यंत्रामध्ये प्रथमच कापसापासून सलग असा पेळू तयार केला जातो. सूत कातण्याच्या प्रक्रियेची ही पहिली पायरी आहे. कारण पेळू हा सुताप्रमाणे सलग व अखंड पेड असतो. फक्त याची जाडी सुतापेक्षा अनेक पटींनी जास्त असते. त्यामुळे पुढील प्रक्रियांमध्ये पेळूची जाडी कमी करत नेऊन शेवटी सूत कातता येते.
गेल्या १०० वर्षांमध्ये विपिंजण यंत्रामध्ये अनेक बदल झाले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वििपजण यंत्राचे उत्पादन हे ५ ते ७ किलो प्रति तास इतके होते तर आजच्या विपिंजण यंत्राचे उत्पादन हे १२० किलो प्रति तासपर्यंत पोहोचले आहे. पूर्वीच्या वििपजण यंत्राला कापूस हा लॅपच्या रूपात पुरविला जात असे तर आजच्या विपिंजण यंत्राला पिंजण यंत्रणेपासून थेट नळ्याच्या साहाय्याने सलगपणे कापूस पुरविला जातो. या यंत्रामध्ये पेळूची जाडी ही नियंत्रित करता येते. जर तलम सूत बनवायचे असेल तर पेळूची जाडी कमी ठेवावी लागते आणि सूत जाडे भरडे बनवायचे असेल तर पेळूची जाडी जास्त ठेवावी लागते.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – धर्मनिरपेक्ष शिक्षण व्यवस्था
शिक्षण आणि दलितोद्धार या दोन गोष्टींची सामाजिक उन्नतीसाठी आवश्यकता आहे हे बडोद्याचे महाराज सयाजीराव तृतीय जाणून होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे पंडित मदन मोहन मालवीय यांनी विद्यापीठासाठी महाराजांकडे एक लाख रु.ची देणगी मागितली. महाराजांनी तशी देणगी देण्याचे मान्य केले; परंतु त्यासाठी त्यांना एक अट घातली. ती अशी की, बनारस विद्यापीठातील ख्रिश्चन, मुस्लीम या धर्मातील दोन दोन आणि हिंदूंपकी हरिजन आणि ब्राह्मण समाजातील दोन दोन अशा आठ विद्यार्थ्यांचा भोजन व राहण्याचा सर्व खर्च गायकवाड सरकार करील; परंतु त्यासाठी मुस्लीम विद्यार्थ्यांपकी एकाने बायबलचा व दुसऱ्याने वेदांचा अभ्यास करावा. ब्राह्मण विद्यार्थ्यांपकी एकाने कुराणाचा तर दुसऱ्याने बायबलचा, हरिजन विद्यार्थ्यांपकी एकाने वेदांचा तर दुसऱ्याने कुराणाचा अभ्यास करावा. ख्रिस्ती विद्यार्थ्यांपकी एकाने वेदांचा व दुसऱ्याने बौद्ध धर्माचा अभ्यास करावा. ही अवघड अट पंडितजींनी मान्य केल्यावर महाराजांनी एकाच्या ऐवजी दोन लाखांची देणगी पंडितजींकडे सुपूर्द केली.
बडोदा संस्थानातील केळुसकर आणि यंदे यांनी भीमराव आंबेडकर या दलित वर्गातील बुद्धिमान आणि तरतरीत मुलाबद्दल महाराजांकडे कौतुक करून त्याच्या शिक्षणासाठी काही आर्थिक मदत सरकारातून व्हावी असे सुचविले. महाराजांनी त्याला समक्ष बोलावून त्याच्या बुद्धिमत्तेची चाचपणी करून त्याला दरमहा २५ रुपयांचे विद्यावेतन सुरू केले. आंबेडकरनेही या शिष्यवृत्तीचे सार्थक मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमधून बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन केले. त्यानंतर महाराजांनी त्याला १९१३ साली दरमहा साडेअकरा स्टर्लिग पौंडांची शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात एम.ए. आणि पीएच.डी. होण्यासाठी पाठविले. महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे सर्व शिक्षण घेऊन परतल्यावर आंबेडकरांनी काही काळ बडोदा सरकारात नोकरी केली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 1:04 am

Web Title: carding machine
टॅग : Navneet
Next Stories
1 गुणग्राहक सयाजीराव
2 टाटांचे प्रेरक सयाजीराव
3 बडोद्याचा ‘लक्ष्मीविलास पॅलेस’
Just Now!
X