कुतूहल हा ज्ञानयज्ञ  २००६ पासून सुरू झाला; हे तेरावे वर्ष आता संपन्न होत आहे. वैज्ञानिक संकल्पना, घरगुती उपकरणातील विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, सुरक्षितता, शेती, रसायने, वस्त्रोद्योग, वनस्पति, मोजमापन आणि या वर्षी मूलद्रव्ये, असे विषय आजवर झाले आहेत.

प्रत्येक विषय सांभाळताना त्या वर्षभरातील लिखाणात जवळपास ३० ते ४० लेखक आपले योगदान देत असतात. आणि गेल्या १३ वर्षांत किमान ४०० जणांचा या यज्ञात सहभाग मिळाला आहे. यातील दोनेकशे प्रथमच लिहिणारे होते, मराठी विज्ञान परिषदेने त्यांस घडविले असे म्हणणे वावगे ठरू नये. यातून परिषदेचे आणखी एक काम सफल होत आहे.

आपल्यासारख्यांची अजोड वाचन-संस्कृति मराठी विज्ञान परिषदेचा – हे सदर अखंड तेवत ठेवण्याचा – उत्साह चंद्रकलेप्रमाणे वाढवीत जाणार आहे. या वर्षीच्या शतकभर प्रतिक्रिया या सर्वच पर्यावरणप्रेमी स्वरूपात ई-मेलद्वारे मिळाल्या; वयोगट हा शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन स्पर्धा-परीक्षोत्सुकांपर्यंत, पाककलेतील रसायन-तज्ज्ञांपासून ते वैद्यकीय पेशातील व्यावसायिकांपर्यंत आणि शिक्षकांपासून ते रसायन-क्षेत्र उद्योजकांपर्यंत असा षट्फेर होता. या प्रतिक्रिया मराठी विज्ञान परिषदेची उमेद शतगुणित करणाऱ्या होत्या; त्यातली एक प्रतिक्रिया ही डोळ्यात अंजन घालू पाहणारी होती – माहिती ही अन्य संकेतस्थळावरील भाषांतरित उतारे असू नयेत. कुतूहलचा उद्देश खचाखच माहिती देणे असा नाहीच मुळी, तर सामान्य वाचकाच्या मनात रोचक माहिती पेरून त्यांचे कुतूहल जागविणे आणि विज्ञानाच्या अनेकविध क्षितिजांची त्यांस ओळख करून देणे, असा आहे. यातून नवीन लेखक निर्माण होणे ही त्याची सहनिर्मिती! वाचकांच्या प्रतिक्रियांमध्ये, ही उपयुक्त माहिती इंग्रजी भाषेतूनही दिली जावी असा आग्रह काहींनी धरला होता. यासाठी वाचकांपकीच कोणी पुढे येऊन हा भार उचलल्यास, तज्ज्ञांकडून त्यावर योग्य संस्कार करवून घेता येतील. अनेकांच्या मते याचे पुस्तक व्हावे इतके यातले लेख रोचक आहेत; परिषदेचा तो प्रयत्न असणारही आहे. ज्या कोणी लेखात भर घालणारी माहिती पाठविली त्यांची परिषद ऋणी आहे.

या वर्षीच्या या सदराचे समन्वयन करताना अनेकांचे सहकार्य मिळाले. त्यात परिषदेच्या विज्ञान अधिकारी अनघा वक्टे यांचा मोलाचा वाटा! लेखक मंडळींशिवाय तर हे काम शक्यच नाही. आणि वाचकांच्या चोखंदळ प्रतिक्रियांचा खुराक तेरा वष्रे वयाच्या या उपक्रमाला बाळसे देणाराच ठरला. ‘लोकसत्ता’मधील चमूचे आभार.

शेवटी एक महत्त्वाची उपलब्धी – हे सर्व करताना धुंडाळाव्या लागलेल्या संदर्भामुळे खोलात जाऊन अनेक गोष्टी शिकता आल्या हे आम्ही सर्वच जण मान्य करू!

– विनायक प्र. कर्णिक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org