05 July 2020

News Flash

मनोवेध : मेंदूतील रसायने

आता ते हृदय ज्या द्रावणात होते ते द्रावण लोएवा यांनी दुसऱ्या बेडकाच्या हृदयात टोचले आणि त्याचीही गती कमी झाली.

एखाद्या व्यक्तीला काही मानसिक आजार असेल तर त्याला मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर, सायकिअ‍ॅट्रिस्ट औषधे देतात. सिग्मंड फ्रॉइड हे मानसिक त्रास कमी करणारे डॉक्टर होते, तरी ते कोणतेही औषध देत नव्हते. त्यांनी सुरू केलेली पद्धती म्हणजे मानसोपचार पद्धती होय. मानसोपचार हे रोग बरे करण्यासाठी आवश्यक आहेत तसेच मनोविकास करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठीदेखील उपयोगी आहेत.

आपल्या भावना आणि शारीरिक बदल यामागे मेंदूतील काही रसायने असतात, मानसिक विकार होतात त्या वेळी मेंदूत केमिकल लोच्या झालेला असतो हे आता सर्वमान्य आहे. अशा रसायनाचा परिणाम प्रथम १९२१ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ ओटो लोएवी (Otto Loewi) यांनी दाखवून दिला.

त्या वेळी ‘व्हेगस नव्‍‌र्ह’ हृदयाची गती कमी करते हे समजले होते. मात्र असे होताना काही रसायनेदेखील पाझरत असावीत असे डॉक्टर लोएवा यांना वाटत होते. हे कसे पाहायचे याची कल्पना त्यांना स्वप्नात सुचली. मध्यरात्री ते त्यांच्या प्रयोगशाळेत गेले. त्यांनी दोन जिवंत बेडकांचे विच्छेदन केले. त्यापैकी एकाच्या हृदयाची व्हेगस नव्‍‌र्ह कायम ठेवली, दुसऱ्याची कापून टाकली आणि ही दोन्ही हृदये सलाईनच्या पाण्यात बुडवून ठेवली. त्यानंतर पहिल्या बेडकाच्या व्हेगस नव्‍‌र्हला उत्तेजना दिल्याने त्या बेडकाच्या हृदयाची गती कमी झाली.

आता ते हृदय ज्या द्रावणात होते ते द्रावण लोएवा यांनी दुसऱ्या बेडकाच्या हृदयात टोचले आणि त्याचीही गती कमी झाली. म्हणजेच व्हेगस नव्‍‌र्हच्या उत्तेजनाने कोणते तरी रसायन पाझरले जाते आणि व्हेगस नव्‍‌र्ह नसली तरी त्या रसायनामुळे हृदयगती कमी होते हे स्पष्ट झाले. त्यांच्या या संशोधनासाठी ते आणि त्यांचे मित्र हेन्री डेल यांना १९३६ साली नोबेल पारितोषिक मिळाले.

हे रसायन आता ‘असायटेल कोलीन’ नावाने ओळखले जाते, ते एक महत्त्वाचे न्यूरोट्रान्स्मीटर आहे. अशी जवळजवळ शंभर रसायने आपल्या मेंदूतील पेशी तयार करतात- डोपामाईन, सेरेटोनीन, एन्डॉर्फिन ही अशीच मेंदूतील रसायने आहेत. यांचा परिणाम म्हणून आपल्या भावना बदलतात हेदेखील सिद्ध झाले आहे. मेंदूतील या रसायनावर परिणाम करणारी रसायने ‘औषधे’ म्हणून मनोरोगतज्ज्ञ डॉक्टर वापरतात. ‘सत्त्वावजय’सारख्या मानसोपचारात मात्र कोणतीही औषधे वापरली जात नाहीत.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 12:07 am

Web Title: chemicals in the brain article manovedh akp 94
Next Stories
1 कुतूहल : छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र   
2 मनोवेध : मेंदूतील भाग
3 कुतूहल : फुलपाखरांचे स्थलांतर 
Just Now!
X